Ticker

6/recent/ticker-posts

एमएचबी पोलिसांची उत्तम कामगिरी

जुगारासाठी करायचे घरफोडी

मुंबई : जुगारासाठी दिल्लीहून मुंबईत येऊन घरफोडी करणाऱ्या दोघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद यासीन शौकत अन्सारी आणि मोहम्मद जमिल अहमद शेख अशी त्या दोघांची नावे असून त्या दोघांच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे.


बोरिवली पश्चिम परिसरात रात्रीच्या वेळेस घरफोडयांचे प्रमाण वाढले होते. त्याची दखल घेऊन रात्रीच्या वेळेस गस्त वाढविण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक हे एक्सर तलाव येथे गस्त करत होते. अन्सारी आणि शेख हे दोघे पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांनी त्या दोघांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्या दोघांकडून घरफोडीचे साहित्य जप्त केले. अन्सारी आणि शेख हे दोघे दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून ते दोघेही नातेवाईक आहेत.


त्या दोघांना जुगाराचा नाद आहे. जुगार खेळण्यासाठी पैसे हवे असल्याने ते दोघे घरफोड्या करण्यासाठी एक्स्प्रेसने मुंबईला यायचे. मुंबईत आल्यावर ते दोघे सकाळी रेकी करायचे. रात्री ज्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असे घर ते फोडत असायचे. पोलिसांनी पकडू नये म्हणून ते स्वतःचा मोबाईल घरी ठेवत असायचे. संपर्कात राहण्यासाठी नातेवाईकाचा मोबाईलचा वापर करत असायचे. चोरी केल्यावर ते दागिने दिल्ली येथे विकायचे. जे दागिने विकले गेले नाही ते दागिने स्वतः च वापरत असल्याचे तपासात समोर आले आहे. अन्सारी आणि शेख सराईत गुन्हेगार असून त्या दोघांविरुद्ध ३५ गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या