Ticker

6/recent/ticker-posts

चारित्र्याच्या संशयातून गर्भवती प्रेयसीची हत्या; शीतपेयातून डांबरगोळ्या दिल्या

मुंबई, दादासाहेब येंधे :  चेंबूर परिसरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका प्रियकराने आपल्या दोन ते अडीच महिन्यांच्या गरोदर प्रेयसीची अतिशय क्रूरपणे हत्या केली. शीतपेयामध्ये डांबराच्या गोळ्या मिसळून प्रेयसीला देऊन तिचा जीव घेण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर आरसीएफ पोलिसांनी आरोपी प्रियकर आशिष मगर याला अटक केली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ तारखेला पीडित महिला आणि तिचा प्रियकर आशिष मगर यांच्यात चारित्र्याच्या संशयातून जोरदार वाद झाला होता. काही वेळाने वाद मिटल्याचे भासवून आशिषने तिला पिण्यासाठी शीतपेय दिलं. मात्र, त्या शीतपेयात डांबराच्या गोळ्या मिसळल्याची पुसटशीही कल्पना त्या पीडित महिलेला नव्हती. तिने ते पेय प्राशन करताच तिला प्रचंड त्रास सुरू झाला आणि अचानक उलट्या होऊ लागल्या.

प्रियकर आशिष मगर याने आपल्याला शीतपेय दिल्याचे आणि त्यानंतर आपल्याला त्रास सुरू झाल्याचे तिने घरच्यांना सांगितले. सुरवातीला आशिषने पोलिसांची दिशाभूल करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. डॉक्टरांनी देखील विषबाधने महिलेचा मृत्यू झाल्याचा सांगितलं आहे.

सुरुवातीला कुटुंबीयांना हा प्रकार सामान्य आजारपणाचा वाटल्याने त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं. परंतु, त्रास सातत्याने वाढत गेला आणि महिला चक्कर येऊन खाली कोसळली. तेव्हा कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी तिला तत्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण, त्या रुग्णालयाने अधिक उपचारासाठी पीडितेला शताब्दी रुग्णालयात हलवलं. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

पाच दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली. प्रेयसीला दिवस गेलेले असताना त्याने कोल्ड्रिंकमध्ये डांबरच्या गोळ्या मिक्स करून तिला ते पिण्यास दिले. त्यानंतर तिला त्रास सुरू झाला आणि तिचा जीव गेला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. पोलिसांकडून आरोपीची कसून चाैकशी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या