घाटकोपरमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
मुंबई : आपल्याला कमी व्याजदरात कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळत असेल तर किती मस्त होईल. असे समजून इच्छुकांच्या रंगाच लागतील. पण, याचाच पुरेपूर गैरफायदा घेत कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली असून यामध्ये एका महिला आरोपीचादेखील समावेश आहे.
'टाटा कॅपिटल'च्या नावाने घरासाठी तसेच वैयक्तिक कारणासाठी खाजगी कर्ज देत असल्याचे सांगून प्रोसेसिंग फी, कर्जाचा विमा उतरविण्यासाठी पैसे अशी वेगवेगळी कारणे सांगून रक्कम उकळली जात असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने या तक्रारीची शहानिशा केली असता घाटकोपर येथे डिजिटल ट्रेनिंग मार्केटिंग या नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटर मधून हा सर्व प्रकार सुरु असल्याचे समोर आले. पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून सतीश दुर्गुळे, सागर फाटक, प्रथमेश पाताडे, दीपिका माळी या चौघांना ताब्यात घेतले. सतीश हा या कॉल सेंटरचा व्यवस्थापक आहे. तर इतर तिघे कर्मचारी असून पोलिसांनी या टोळीकडून १० मोबाइल तसेच ग्राहकांच्या नोंदी असलेले इतर दस्तावेज हस्तगत केले आहेत. या चौघांनी मिळून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. फसवणूक झालेल्या लोकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा