डिजीटल उपक्रमांवर भर
‘लोकशाही पंधरवडा’ चे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती लक्षात घेता, डिजीटल व ऑनलाईन पद्धतीने अधिकाधिक उपक्रम राबविण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक २६ जानेवारी २०२२ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर चर्चासत्रे, मुलाखती आणि लेख सोशल मीडियामार्फत प्रसारित करण्यात येत आहे.
लोकशाहीची मुलभूत तत्त्वे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व इत्यादी बाबी या कार्यक्रमांतर्गत नागरिकांपर्यंत पोहचवणे हा मुख्य हेतू आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाचे दायित्व, जबाबदारी, त्यांची वैशिष्ट्ये याबाबत जनजागृती केली जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक देखील येत्या काळात अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा निवडणूक विभाग लोकशाही पंधरवडा साजरा करुन संपूर्ण मुंबई महानगरात येत्या निवडणुकीमध्ये निष्पक्ष, निकोप आणि जास्तीत-जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. कोविड - १९ विषाणू प्रादुर्भावामुळे यंदाचा लोकशाही पंधरवडा लोकांची गर्दी न होता, ऑनलाईन अपारंपरिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून साजरा होत आहे. म्हणूनच लोकशाही पंधरवडा निमित्ताने वृत्तपत्रांच्या स्थानिक आवृत्त्या, स्थानिक केबल वाहिन्या, समाज माध्यमं (सोशल मीडिया), डिजिटल मीडिया, भ्रमणध्वनी लघूसंदेश, नभोवाणी केंद्र याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
तसेच राजकीय पक्षांशी संबंधीत नसलेल्या, स्थानिक सिनेमा, क्रीडा, संस्कृती, साहित्य इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांचे मतदार जागृती संदर्भात आवाहन करणारे व्हिडिओ संदेश देखील सोशल मीडियावरुन प्रसारित करण्यात येत आहेत. विविध महाविद्यालये, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, अ-राजकीय संस्था, गृहनिर्माण संस्था इत्यादींना ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. विविध शासकीय वाहनांवर लोकशाही पंधरवड्याच्या संदेशाचे पोस्टर्स लावण्यात येत आहेत. एनसीसी, एनएसएस, स्काऊट ऍण्ड गाईड इत्यादींसारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देणे, ऑनलाईन पद्धतीने निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा घेणे इत्यादी उपक्रम महानगरपालिकेच्या निवडणूक विभागातर्फे करण्यात येत आहेत.
(जसंवि/५४१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा