मे. युनायटेड वे मुंबई, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचएसबीसी या कंपन्यांच्या सहकार्याने बांधण्यात आले सुविधा केंद्र
कपडे धुण्यासह आंघोळीची व प्रसाधनगृहाचीही सुविधा एकाच ठिकाणी असणारे सुविधा केंद्र मुंबईकरांच्या सेवेत रुजू
"मुंबईकरांना स्वच्छतेच्या विविध सोयी सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, या उद्देशाने मुंबईत विविध ठिकाणी सामुदायिक सुविधा केंद्रे उभारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा केंद्रे विविध कंपन्यांच्या व संस्थांच्या सहकार्याने उभारण्यात येत आहेत. ही सुविधा केंद्रे अधिकाधिक पर्यावरण-पूरक पद्धतीने उभारण्यात येत असल्याने या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करण्यासह वापरलेल्या पाण्याचे पुनर्-चक्रीकरण करून त्याचा पुन्हा वापर करण्यात येत आहे," अशी माहिती राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि मे.युनायटेड वे मुंबई, मे.हिंदूस्थान युनीलिव्हर व एच.एस.बी.सी. या संस्थांच्या सहयोगातून, सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत 'जी उत्तर' विभागातील धारावी पंपींग परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक पध्दतीच्या दुमजली सार्वजनिक केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
याप्रसंगी उपमहापौर ऍडव्होकेट श्री. सुहास वाडकर, आमदार श्री. सदा सरवणकर, प्रभाग समिती अध्यक्ष श्री. टी. एम्. जगदीश, स्थानिक नगरसेविका श्रीमती गंगा कुणाल माने, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. हर्षद काळे, 'जी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर, माजी महापौर व नगरसेविका श्रीमती श्रद्धा जाधव, नगरसेवक श्री. वसंत नकाशे, नगरसेविका श्रीमती हर्षला मोरे, नगरसेविका श्रीमती मरिअम्मल तेवर, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव मेहता, एचएसबीसी या कंपनीचे मुख्य कार्यकारी श्री. हितेंद्र दवे यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाच्या कार्यक्षेत्रातील धारावी परिसरात आज लोकार्पण करण्यात आलेल्या या एकाच सुविधा केंद्रात तब्बल १११ शौचकूपे असल्याने ते देशातील सर्वात मोठे 'सामुदायिक सुविधा केंद्र' (सामुदायिक शौचालय) ठरले आहे.
या सुविधा केंद्रामध्ये पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था आहे. तसेच लहान मुले आणि अपंगांकरिता १११ शौचकूपे आणि ०८ स्नाहगृहे यांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर या केंद्रामध्ये परिसरातील नागरिकांकरिता या सुविधा सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.वॉटर सिस्टीम, गरम पाण्यासाठी सौर ऊर्जा पॅनल, कपडे धुण्यासाठी वॉशिंग सेंटर (Laundry), तसेच याद्वारे तयार होणारे सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी पाण्याचे पुनर्चक्रीकरण करणारा प्रकल्प (Grey Water Treatment Plant) इ. अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
सदर शौचालयामुळे धारावी उदंचन केंद्राच्या आसपासच्या परिसरातील नाईक नगर, संग्राम नगर, शताब्दी नगर इत्यादी ठिकाणच्या जवळ-जवळ ५ हजार नागरिकांची सोय होणार आहे.
मे. युनायटेड वे मुंबई, मे. हिंदुस्तान युनीलिव्हर व एच.एस.बी.सी. या संस्थांच्या सहयोगातून आणि सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत व त्यांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध १० ठिकाणी 'सामुदायिक सुविधा केंद्र' (सार्वजनिक शौचालयासह) उभारण्यात येणार आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित संस्था यांच्यादरम्यान सामंजस्य करार आज झालेल्या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला आहे.
आज झालेल्या सामंजस्य करारानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या १० ठिकाणी सामुदायिक सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याबाबतचा संक्षिप्त तपशील खालील प्रमाणे आहे:
१. 'जी उत्तर' विभाग :- प्रेम नगर, धारावी.
२. 'जी उत्तर' विभाग :- काळा किल्ला, धारावी
३. एन विभाग :- भिम नगर, घाटकोपर (पश्चिम)
४. एन विभाग :- साईनाथ नगर, घाटकोपर (पश्चिम)
५. 'एम पूर्व' विभाग :- टाटा नगर, गोवंडी
६. 'एम पूर्व' विभाग :- तानाजी मालूसरे मार्ग, गोवंडी
७. 'एम पूर्व' विभाग :- गायकवाड नगर, चेंबूर
८. 'एच पूर्व' विभाग :- दावरी नगर, सांताक्रुज (पूर्व)
९. 'एच पूर्व' विभाग :- खेरवाडी वांद्रे (पूर्व)
१०. 'एच पूर्व' विभाग :- कुचिकोरवे नगर, कलिना सांताक्रुज (पूर्व)
(जसंवि/ ५५६)
0 टिप्पण्या