Ticker

6/recent/ticker-posts

पाच कोटींचे दोन माणिक घेऊन बनावट हिरे दिले

म्यानमारच्या व्यापाऱ्याची फसवणूक करणारी

चार जणांची टोळी जेरबंद

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत म्यानमारच्या व्यापाऱ्याची पाच कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा डॉक्टर डी. बी. मार्ग पोलिसांनी अवघ्या १२ तासांत लावला आहे. पाच कोटींचे माणिक घेऊन त्या व्यापाऱ्याला किमती हिरे देण्याचा सौदा ठरला होता. मात्र, आरोपींनी माणिक घेऊन व्यापाऱ्याला बनावट हिरे दिले होते.


ये मिन एम एच अली मोहम्मद दादाभाई (५८) असे त्या म्यानमारच्या व्यापाऱ्याचे नाव आहे. वर्षभरापूर्वी हिरे खरेदी-विक्री करणाऱ्या उदय चोक्सी यांच्याशी ये मिन यांची समाजमाध्यमातून (ऑनलाईन) ओळख झाली होती. दोघे ऑनलाईनच संपर्कात होते. चार महिन्यांपूर्वी दोघे जयपूरला भेटले. तेथे दोघांमध्ये माणिकच्या बदल्यात हिरे देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी ग्रँट रोडच्या पंचरत्न इमारतीत ये मिन आणि उदय चोक्सी, सुरेश बोराड, खेताराम देवासी, विंकल शहा, प्रवीण जैन असे एकत्र एका खोलीत भेटले. उदय याने काही हिरे यांना बघण्यासाठी दिले. यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवून आरोपींनी हातचलाखी करून ये मिन यांच्याकडील पाच कोटी किंमतीचे माणिक काढून घेतले. मग बनावट हिरे त्याला देऊन तेथून पळ काढला. 



आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ये मिन यांनी डॉक्टर डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. खबऱ्यांच्या मदतीने ये मिन यांचे पाच कोटींचे माणिक चोरून पळालेल्या उदय चौकशी, सुरज बोराड, खेताराम देवासी, विंकल शहा या चौकडीला पोलिसांनी बारा तासांच्या आत माणिकसह पकडले. हे सर्वजण  मुंबईबाहेर पलायन करण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. 






ट्विटरदेखील पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट तपासाचे मुंबई पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या