Ticker

6/recent/ticker-posts

शेतात गाडून ठेवलेले नऊ किलो सोने मुंबई पोलिसांनी खोदून आणले

लोकेशन वरून १४ तासांचा थरारक पाठलाग, सर्व आरोपी राजस्थानचे

मुंबई, दादासाहेब येंधे : साथीदारांच्या मदतीने नोकराने मालकाच्या कार्यालयातील तब्बल सव्वा आठ कोटींच्या १७ किलो सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करून पळ काढला. ही चोरी करताना सीसीटीव्ही मध्ये पाच आरोपी कैद झाले होते. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी चोरांनी थेट मोबाईल कॉल न करता हॉटस्पॉट वरून व्हाट्सअप कॉलिंग द्वारे, कधी वाहनचालकांच्या तर कधी हॉटेलमधील वेटरच्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याची शक्कल वापरली होती. मात्र, यातील एकाने नातेवाईकाला कॉल केला आणि त्यांचा लपाछपीचा खेळ संपला. पोलिसांनी याच मोबाईल लोकेशनवरून त्यांचा बिकानेर ते इंदौर पर्यंत सुमारे १४ तासांचा अथक पाठलाग करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या आरोपींनी शेतात लपवलेले नऊ किलो सोन्यासह एकूण १५ किलोचे दागिने हस्तगत करण्याची उत्कृष्ट कामगिरी पोलिसांनी बजावली आहे. 



भुलेश्वरचे सोने व्यवसायी खुशाल टामका (वय, ४८ ) यांच्याकडे गणेश हीराराम कुमार देवासी (वय, २१) हा काम करत होता. टमाका हे काही दिवस कामावर येणार  नसल्याने देवासी याने रमेश प्रजापती याच्या मदतीने टमाका यांच्या कार्यालयात ठेवलेले सोने चोरी करण्याचा कट आखला होता असे पोलिस चौकशीत समजले. आरोपीचे ओला कारद्वारे बोरवली संजय गांधी उद्यान येथून पालनपुरला गेले. तेथून पुन्हा वाहन बदलून त्यांनी रेवधर गाठले. तेथून सिरोही अबु रोड येथील गोशाळेमध्ये दागिन्यांचे वाटप केले. यामध्ये गणेश याने स्वतःसाठी सात किलो सोन्याचे दागिने ठेवले, तर प्रजापतीला दोन किलो दागिने दिले तसेच अन्य आरोपींना हातात येईल तसे कमी जास्त दागिने आणि पैसे देण्यात आले होते. तेथून प्रजापतीने त्याच्या सीरोहीतील पडीक जमिनीत सहा ते सात फूट खोल खड्डा खणत ते दागिने  गाडून ठेवले व तेथून ते पसार झाले. 


प्रजापती हाती लागल्यानंतर पोलिस पथकाने शेत जमिनीतून नऊ किलो दागिने हस्तगत केले. मालकाच्या कार्यालयातील सव्वा कोटींच्या सोन्यावर हात साफ करत पसार झालेल्या टोळीतील दहा जणांना पोलिसांनी अटक केली. गणेश देवासी, रमेश प्रजापती, कैलास भाट, किसन चव्हाण, हिम्मत सिंह बालिया, लोकेंदर राजपूत, प्रल्हादसिंह चौहान, शामलाल सोनी, विक्रम कुमार वास, उत्तम गांधी अशी या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी राजस्थान मधील सिरोही भागातील आहेत. दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.



मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.

तसेच एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांनी १४ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर उत्कृष्ट कमगिरी करून परतलेल्या संपूर्ण टीमचे अनोखे स्वागत केले. व्हिडिओ पहा...👇























Press Note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या