Ticker

6/recent/ticker-posts

बोरिवली मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "मुंबई पब्लिक स्कूल सी बी एस ई चिकूवाडी" शाळेच्या नव्या भव्य वास्तूचे माननीय पालक मंत्री महोदयांच्या हस्ते लोकार्पण

 परिपूर्ण समाज घडविण्यात शाळांची भूमिका महत्त्वाची - मा. पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे
 
७ मजली शाळेत आहेत अत्याधुनिक वर्ग खोल्या, संगणक कक्ष, व्यायाम शाळा, सभागृह, योग प्रशिक्षण, प्रयोगशाळा, भाषा अभ्यास वर्ग, प्रसार माध्यम अभ्यास वर्ग यासह विविध शिक्षण उपयोगी सोयी सुविधा
 
"परिपूर्ण समाज घडविण्यात शाळांची भूमिका महत्त्वाची असते. हीच बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १२ सीबीएससी शाळा मुंबई पब्लिक स्कूलच्या माध्यमातून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त 'आय सी एस ई' शिक्षणक्रमाची १ शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुंबईत सुरू झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर केंब्रिज सारख्या विद्यापीठांशी देखील करार करण्यात आला आहे. या सर्व बाबी शैक्षणिक आणि पर्यायाने सामाजिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे बोरीवली पश्चिम परिसरातल्या चिकूवाडी मध्ये आज लोकार्पित होत असलेल्या 'मुंबई पब्लिक स्कूल' शाळेत देखील सीबीएसई शिक्षण क्रमावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. आज लोकर्पित होत असलेल्या या शाळेची भव्य वास्तू बघितल्यावर क्षणभर आपणही या शाळेत प्रवेश घ्यायला हवा असं वाटून गेलं" असे कौतुकोद्गार महाराष्ट्राचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.
 
श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बोरीवली पश्चिम परिसरातील चिकूवाडी मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'मुंबई पब्लिक स्कूल'साठी उभारण्यात आलेल्या नव्या भव्य इमारतीचे लोकार्पण आज करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, स्थानिक खासदार श्री गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार श्री सुनील राणे, आमदार श्री विलास पोतनीस, आमदार श्री प्रकाश सुर्वे, उपमहापौर श्री सुहास वाडकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे), स्थापत्य समिती (उपनगरे) चे अध्यक्ष श्री स्वप्निल टेंबवलकर, आर मध्य विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती सुजाता पाटेकर, स्थानिक नगरसेविका श्रीमती बिना दोशी, नगरसेविका श्रीमती शीतल म्हात्रे, नगरसेवक श्री बाळकृष्ण ब्रीद, नगरसेविका श्रीमती गीता सिंघल, सह आयुक्त (शिक्षण) श्री अजित कुंभार, उपायुक्त श्रीमती भाग्यश्री कापसे, आर मध्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री वकार जावेद म. हफीज़, शिक्षणाधिकारी श्री राजू तडवी यांच्यासह शाळेतील शिक्षिका - शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
 
या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना स्थानिक खासदार श्री. गोपाळ शेट्टी यांनी मनपा शाळेची नवीन भव्य-दिव्य वास्तू उभारल्या बद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्री राजू तडवी यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी (पश्चिम उपनगरे) श्रीमती सुजाता खरे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनपा शिक्षण विभागाच्या संगीत उपविभागाद्वारे विविध प्रेरणादायी गीते सादर करण्यात आली.



 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "मुंबई पब्लिक स्कूल सीबीएसई चिकूवाडी" शाळेच्या नव्या भव्य वास्तु बाबत थोडक्यात माहिती
१. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २,२२२.९३ चौरस मीटर (सुमारे २३ हजार ९२७ चौरस फूट) भूखंडावर या ७ मजली (Ground + 6) शाळेचे बांधकाम करण्यात आले आहे. या शाळेचे एकूण बांधकाम हे ४६०३.१४ चौरस मीटर (सुमारे ४९ हजार ५४८ चौरस फूट) इतके आहे.
२. या शाळेत एकूण ४२ वर्गखोल्या असणार असून त्यांचा वापर हा 'सीबीएसई' शिक्षण पद्धतीनुसार होणार आहे. याअंतर्गत प्रामुख्याने विषयानुरूप वर्गखोल्या असणार असून विद्यार्थी हे ज्या विषयाची तासिका असेल, त्या विषयाच्या वर्ग खोलीत नुसार तासिका निहाय पद्धतीने जातील.
३. या शाळेत संगणकीय प्रयोग शाळा, ग्रंथालय, स्वतंत्र वाचनालय, जीवशास्त्र - रसायन शास्त्र - भौतिकशास्त्र या विषयांच्या स्वतंत्र व अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आहेत.
४. शिक्षण पूरक बाबींसाठी या शाळेमध्ये गायन - वादन - नृत्य आदी संगीत विषय बाबींसाठी स्वतंत्र वर्गखोल्या आहेत. त्याच बरोबर प्रसारमाध्यम अभ्यास, छायाचित्रणकला (फोटोग्राफी), शिल्पकला, चित्रकला, शिवणकाम, सुतारकाम इत्यादी अभ्यासक्रमांसाठी देखील स्वतंत्र वर्गखोल्या आहेत.
५. क्रीडा विषयक बाबींसाठी देखील या शाळेत भव्य पटांगण असण्यासह स्वतंत्र वर्गखोल्या व शिशुवर्गांसाठी घसरगुंडी, झोके, सिसॉफळी इत्यादी सुविधा आहेत.
६. या शाळेमध्ये योग प्रशिक्षणासाठी स्वतंत्र खोली असल्यास सह व्यायाम शाळा देखील असणार आहे.
७. ज्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज असेल त्यांच्यासाठी समुपदेशकाची व स्वतंत्र खोलीची व्यवस्था या शाळेमध्ये असणार आहे.
८. या शाळेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणारे बसावयाचे बाक व लिहावयाचे मेज (टेबल) हे पुनर्चक्रीकरण (रिसायकल) केलेल्या वस्तूंपासून तयार केलेले असणार आहे.
९. या शाळेत प्रत्येक मजल्यावर जलशुद्धीकरण यंत्रासह पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळेच्या इमारतीमध्ये दोन उद्वाहनांची (लिफ्ट) व्यवस्था आहे.
१०. प्रत्येक मजल्यावर मुला-मुलींसाठी व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालय उपलब्ध आहे.
११. या शाळेत प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिताचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.
१२. 'मुंबई पब्लिक स्कूल' अंतर्गत १२ शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे सुरू करण्यात आल्या आहेत. या १२ शाळांमध्ये साधारणपणे ४ हजार जागा असून यंदाच्या प्रवेश प्रक्रिया दरम्यान या ४ हजार जागांसाठी तब्बल १० हजार अर्ज प्राप्त झाले होते. बोरिवली पश्चिम परिसरातील चिकूवाडी परिसरात आज लोकार्पण करण्यात आलेली शाळा देखील सदर १२ शाळांपैकी एक शाळा आहे.
























( जसंवि / ३५१)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या