एका महिलेसह दोन पुरुष डॉक्टरांना अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : घाटकोपर येथील तीन खासगी दवाखान्यांमध्ये छापा टाकून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तीन बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश केला आहे. त्यात एका महिलेसह दोन पुरुष डॉक्टरांचा समावेश आहे. भरत म्हस्के, नीलम पासी, आणि सुरज सरोज अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रासह इतर साहित्य जप्त केले आहे.
घाटकोपर येथील आंबेडकर नगर, रमाबाई कॉलनीत वारे, धनिस्था आणि सरोज नावाचे तीन दवाखाने आहेत. या ठिकाणी कार्यरत डॉक्टर बोगस असून त्यांच्याकडे कुठलीही अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नाही तरीही ते रुग्णांना तपासून त्यांची लूट करीत असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली होती.
माहितीची शहानिशा करण्यासाठी श्रीधनकर, प्रिया थोरात, महेंद्र दोरकर व अन्य पथकाने या तिन्ही ठिकाणी छापे टाकले होते. सध्या ते तिघेही आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

0 टिप्पण्या