निनावी फोन करणारा नागपूरचा शेतकरी अटकेत
मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सागर मांढरे असे या व्यक्तीचे नाव आहे. मांढरे हा नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकडधोकडाचा शेतकरी आहे. जमिनीच्या ७/१२ साठी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी फोन केल्याची कबुली त्याने दिली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणेत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा कॉल रविवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास मंत्रालयातील कंट्रोल रूमला आला होता. त्यांतरण मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती. बॉम्बच्या कॉलची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले होते. या पथकाने इमारतीची कसून तपासणी केली. यावेळी खबरदारी म्हणून मंत्रालयाचे सर्व गेट बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.मात्र, मंत्रालयात काही सापडले नाही. अखेर तपासात हा कॉल एक अफवा असून सदर कॉल हा नागपूरमधून आल्याचे स्पष्ट झाले. अखेर मुंबई पोलिसांनी नागपूर पोलिसांची मदत घेत मांढरे यास अटक केली.


0 टिप्पण्या