आदेश न निघाल्यास मंगळवारी आंदोलन
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचारी यांना वार्तांकन आणि दैनंदिन कार्यालयीन कामासाठी फिरण्याची मुभा मिळावी, या मागणीबाबत राज्य सरकारच्या निर्णयाकडे पत्रकारांचे लक्ष लागले आहे. याबाबत सरकारने सोमवार, दि. २६ एप्रिल, २०२१ रोजी सायं. ६.०० वाजेपर्यंत अनुकूल निर्णय न घेतल्यास मंगळवारी दुपारी वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनासमोर सरकारच्या निषेधार्थ ती आंदोलन करण्याचा निर्णय आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या विविध पत्रकार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचारी यांच्यासाठी माध्यम आस्थापनांना प्रत्येकी २५ ओळखपत्र देण्याची मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्याबाबतचे आदेश सोमवार दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी प्रशासकीय स्तरावर काढण्यात येणार आहेत. या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्यशासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त) श्री. गणेश रामदासी यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. येत्या सोमवारी राज्यसरकार याबाबतचा आदेश काढणार आहे. या आदेशाकडे पत्रकारांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळपर्यंत हा आदेश न निघाल्यास मंगळवारी दुपारी २.०० वाजता सर्व पत्रकार संघटना राज्यसरकारच्या निषेधार्थ आंदोलन करतील, असा निर्णय आजच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

0 टिप्पण्या