मुंबई : ख्रिश्चन बांधवांचा गुड फ्रायडे हा दिवस यावर्षी 2 एप्रिल 2021 रोजी तसेच ईस्टर सन्डे 4 एप्रिल 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाते. कोविड- 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर सर्वधर्मीय सण साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोविड- 19 चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता 28 मार्च 2021 ते 4 एप्रिल 2021 या होली वीक दरम्यान येणारा "गुड फ्रायडे व ईस्टर सण्डे" हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
शासनाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत :-
28 मार्च ते 4 एप्रिल, 2021 या दरम्यान होली वीक'मध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्या वेळी चर्चमधील जागेनुसार लोकांच्या उपस्थितीचे नियमन करावे. मोठे चर्च असल्यास त्यामध्ये जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती व चर्चमधील जागा कमी असल्यास तिथे 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थनासभेचे आयोजन करावे. जेणेकरुन चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी न होता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील. आवश्यकतेनुसार 4 ते 5 खास प्रार्थना सभांचे (Multiple Masses) आयोजन करावे.
ख्रिश्चन धर्मीय भावीक लोक हे प्रार्थना सभेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करतील याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. चर्चमध्ये निर्जतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. चर्चचे व्यवस्थापक यांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. तसेच या सणांसाठी दिले जाणारे संदेश व्हॉटसअॅप, फेसबुक,युट्यूब यासारख्या सोशल मिडीया माध्यमांतून प्रसारीत करावे.
चर्चच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे वा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.
कोव्हिड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही गृहविभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 टिप्पण्या