स्वतः रक्तदान करून पोलिसाने वाचविले प्राण
दादासाहेब येंधे:
१ डिसेंबर २०२० रोजी लातूर मधील औराद शहाजणी येथील रहिवासी बालाजी सुर्यवंशी वय ५६ हे औराद जवळील मिरकल या गावाजवळून दुचाकीवरून येत असताना मागुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक देऊन गेले असता बालाजी सुर्यवंशी हे गंभीर जखमी झाले होते.
उपचारासाठी फुलाबाई बनसोडे हॉस्पिटल लातूर येथे त्यांना दाखल करण्यात आले. त्यांचा रक्तगट A निगेटिव्ह हा होता. आपणा सर्वास माहीतच आहे की A निगेटिव या रक्तगटाच्या खूप कमी व्यक्ती असतात. रुग्णास A निगेटिव्ह रक्ताची खूप आवश्यकता होती. यारक्तगटाची व्यवस्था होत नसल्यामुळे हॉस्पिटलच्या वतीने 'लव लातूर जीव लातूर' या टीमला कळविण्यात आले. या टीमकडून किल्लारी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले PSI अमोल गुंडे यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचला. हा संदेश त्यांना पोहोचल्यावर कोणाच्यातरी जीवाला खूप धोका आहे ही जाणीव अमोल गुंडे यांना झाली. त्यांनी तातडीने लातूर मध्ये असलेल्या भालचंद्र रक्तपेढीला भेट देऊन स्वतः रक्तदान केले व शक्य तेवढ्या लवकर ते रक्त गरजू रुग्णालयापर्यंत पोचवले गेले.
एका गरजू रुग्णाला तातडीने रक्ताची मदत मिळाली म्हणून त्या रूग्णाचे प्राण वाचले आहेत. अमोल गुंडे यांच्या या कार्यामुळे लातूर पोलिसांची मान नक्कीच उंचावली गेली आहे. या खाकीतील देवाला सलाम...


0 टिप्पण्या