गुन्हे शाखेने तरुणाला ठोकल्या बेडया
मुंबई, दादासाहेब येंधे : आपल्या मैत्रिणीचे दुसऱ्या तरुणासोबतचे फोटो पाहून चिडलेल्या मित्राने बनावट इंस्टाग्राम अकाउंट वर खाजगी फोटो शेअर करण्याची धमकी दिल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत उघड झाले आहे. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम असल्याचेही समजते. याप्रकरणी गुन्हे शाखेने कळवा येथून अक्षय पवार या इसमास अटक केली आहे.
बोरवली परिसरात २३ वर्षे तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. एकाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शिवीगाळ करून तिला व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. संबंधित व्हिडिओ रेकॉर्डिंग तक्रारदार तरुणीच्या भावासह सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. अखेर त्या तरुणाच्या वाढत्या मागणीमुळे ६ सप्टेंबर रोजी तरुणीने बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला.
गुन्हे शाखेच्या कक्ष-११ नेही अधिक तपास केला असता आरोपीने बनावट इंस्टाग्राम अकाउंट चा वापर केल्याचे समोर आले. तांत्रिक तपासातून अक्षय आनंदा पवार (वय वर्षे २४) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पवारने परस्पर हे फोटो मिळवून तरुणीला त्रास देण्यासाठी त्याने बनावट अकाउंटचा वापर करत तिला धमकाविण्यास सुरुवात केल्याची कबुली दिली आहे.

0 टिप्पण्या