पोलिसांचे माणुसकीचे दर्शन
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनाच्या संकट काळात पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन घाटकोपर येथील भटवाडीमध्ये दिसून आले. भटवाडी येथील सिद्धी गणेश मंदिराच्या बाजूला गेल्या दोन दिवसांपासून एक ज्येष्ठ नागरिक आजारी अवस्थेत पडून होते. येथील स्थानिक रहिवाशी महेश पोळ यांनी याची माहिती शुक्रवारी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत या वृद्ध व्यक्तीला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या वृद्ध एसमाचे नाव पद्माकर पडवळ, वय वर्षे ८० असे असून घाटकोपर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत लांडगे व इतर कर्मचारी यांनी स्वतः या व्यक्तीला उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. या व्यक्तीच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत. कोरोनाच्या संकटात या वृद्ध व्यक्तीला कुणी हात लावण्यास धजावत नसताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीला वेळेत उपचार मिळाल्यामुळे घाटकोपर पोलीस ठाणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

0 टिप्पण्या