वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे पालिका कर्मचार्याचा मृत्यू
मुंबई, दादासाहेब येंधे : पालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयात पालिका सहाय्यक चिटणीस (कनिष्ठ) पदावर काम करणारे अजित दुखंडे (वय ५२) हे बुधवारी कार्यालयात आल्यानंतर दुपारनंतर त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यामुळे सहकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात असलेल्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना कोरोना वरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. त्यानंतर पालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाला याची माहिती देऊन रुग्णवाहिकेची मागणी सहकारी कर्मचाऱ्यांनी केली. कक्षाने त्यांना१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अर्धा तासात ही रुग्णवाहिका येईल, असे उत्तर दिले. सुमारे तासाभरानंतर दुपारी तीन वाजता आलेल्या या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. भाजपच्या पालिका कार्यालयात असताना अजित दुखंडे हे पालिकेच्या सेवेत लागले होते.
पालिका मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष असून त्याच इमारतीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. हे दुर्दैव. रुग्णवाहिका येईपर्यंत ते बेशुद्ध पडून होते. त्यामुळे त्यांना वेळेवर रुग्णालयात दाखल केले असते तर कदाचित ते वाचले असते असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.

0 टिप्पण्या