मुंबई, दादासाहेब येंधे : दहिसर पोलिसांनी टॅक्सी आणि ऑटो-रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींनी मीटरमध्ये एलईडी रनिंग किट नावाचे एक उपकरण बसवले होते.
या उपकरणामुळे वाहनाचा मीटर सामान्यपेक्षा जास्त वेगाने अंतर आणि भाडे दाखवत होता, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या खऱ्या भाड्यापेक्षा जास्त पैसे आकारले जात आहेत याची कल्पनाच येत नव्हती. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी मीटरमध्ये फेरफार केलेली पाच वाहने आणि मीटरमध्ये फेरफार करण्यासाठी वापरली जाणारी अनेक एलईडी रनिंग सर्किट उपकरणेही जप्त केली आहेत. सदर कारवाईत टॅक्सी चालक जोहेब अल्ताफ देशमुख (३२) याच्यासह मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट बसवून देणाऱ्या अमीन रमजान पठाण (३१) विरुद्ध २ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला.
या कारवाईत छेडछाड केलेले इलेक्ट्रॉनिक भाडेमीटर आणि टॅक्सी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दहिसर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाला परिसरातील काही रिक्षा आणि टॅक्सींच्या मीटरमध्ये तांत्रिक छेडछाड करून कृत्रिमरीत्या भाडेवाढ केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत एका डमी प्रवाशाला (एम एच ०१ सी जे ७४८७) क्रमांकाच्या टॅक्सीत बसवले. दहिसर ते जोगेश्वरी आणि पुन्हा दहिसर असा प्रवास केल्यानंतर टॅक्सी अशोकवन परिसरातील गोकुळ आनंद हॉटेलजवळ थांबवण्यात आली.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टॅक्सीची तपासणी करण्यात आली. तपासणीत सरकारी भाडेमीटरमध्ये बेकायदेशीररीत्या छेडछाड झाल्याचा अभिप्राय आरटीओ अधिकाऱ्यांनी दिल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये जोएब अल्ताफ देशमुख (३२), अमीन रमजान पठाण (३१), रियाझ अब्दुलगनी शेख (४५), नजीर इब्राहिम पटेल (५७) आणि आनंद कुमार नानकप्रसाद राय (६०) यांचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलिस ठाण्याच्या गुंडाविरोधी पथकाने केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शिवाजी साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार हेमंत बाबुराव विचारे, पोलिस शिपाई सुनील चंद्रकांत राठोड, संतोष काशिनाथ भागवत आणि ऋषिकेश प्रविण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

0 टिप्पण्या