मुंबई, दादासाहेब येंधे : ऑनलाइन गेमिंग, क्रिकेट बेटिंग आणि कॅसिनोच्या नावाखाली सायबर फसवणूक करण्यासाठी 'म्युल बँक अकाउंट' उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा डोंगरी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून, तपासात आणखी पाच पाहिजे आरोपी निष्पन्न झाले आहेत. पोलिसांनी ११० बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे व साहित्य ताब्यात घेतले असून, त्यापैकी १७ खात्यांचा देशभरातील ३८ सायबर गुन्हे आणि तक्रारींशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
डोंगरी पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाला मिळालेल्या गोपनीय आणि विश्वसनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या गरजू व्यक्तींना अल्प आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडली जात होती. त्यानंतर या खात्यांची पासबुक, डेबिट कार्ड, चेकबुक, सिमकार्ड आदी साधने ताब्यात घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणाचा तपास मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, डोंगरी तसेच नवी मुंबईतील बेलापूर, पनवेल आणि उस्मानाबादपर्यंत करण्यात आला. सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाबाहेर, डॉ. महेश्वरी रोड, डोंगरी येथे कारवाई करून पोलिसांनी तिघांना अटक केली.
अटक आरोपींमध्ये निखिल कमलकुमार जसवानी (२८, रा. पिपरिया, जि. होशंगाबाद, मध्य प्रदेश), राहुल श्यामलाल परवानी (३२, रा. मध्य प्रदेश) आणि जय बिहारीलाल तीरथानी (२६, रा. कटणी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. तपासात आणखी पाच पाहिजे आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात ज्योती पाटील, नया डोंगरे आणि निशा डोंगरे, तिघीही रा. लल्लूभार्ड कम्पाउंड, मानखुर्द, मुंबई, यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ४२ बँक पासबुक, ७० डेबिट कार्ड, ३६ सिमकार्ड, २३ मोबाइल फोन, तीन लॅपटॉप, एक टॅब, १२ बँक किट आणि एक मोटार कार, असा अंदाजे ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त डिजिटल उपकरणांमधील माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, त्यातून या नेटवर्कशी संबंधित आणखी व्यक्ती आणि आर्थिक व्यवहारांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या ११० बँक खात्यांपैकी आतापर्यंत १७ खात्यांची माहिती संबंधित बँकांकडून मिळाली आहे. या खात्यांतील आर्थिक व्यवहार, तांत्रिक माहिती आणि विविध राज्यांतील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींची पडताळणी केली असता, देशभरातील ३८ सायबर गुन्हे आणि तक्रारींचा संबंध या खात्यांशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील दोन, कर्नाटक नऊ, तेलंगणा सहा, दिल्ली दोन, मध्य प्रदेश दोन, उत्तर प्रदेश पाच, केरळ दोन, तमिळनाडू दोन, गुजरात दोन, जम्मू-काश्मीर एक आणि पश्चिम बंगाल तीन गुन्हे किंवा सायबर तक्रारींचा समावेश आहे. त्यामुळे डोंगरी पोलिसांच्या या गुन्ह्याचा तपास मुंबईपुरता मर्यादित न राहता देशातील विविध राज्यांपर्यंत पोहोचला आहे.
तपासातून उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार संबंधित १७ बँक खात्यांमध्ये अवघ्या दीड ते दोन महिन्यांत सुमारे १२५ कोटी ४५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. या रकमेचा स्रोत, व्यवहारांची दिशा, लाभार्थी खाती आणि सायबर गुन्ह्यांशी असलेला संबंध याबाबत पोलिसांकडून सखोल आर्थिक तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या