Ticker

6/recent/ticker-posts

३० कोटीच्या पोन्झी गुंतवणूक फसवणूक करणाऱ्या बोगस कंपनीच्या चार संचालकांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे :  कमी कालावधीत भरघोस आणि खात्रीशीर परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची तब्बल ३० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाने उघडकीस आणला आहे. एआय ओरिजिन/डिजिटल ओरिजिन' या कथित कंपनीच्या माध्यमातून हा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप असून, कंपनीच्या संचालकांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

आर्थिक गुप्तवार्ता पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपी विविध माध्यमे आणि सेमिनारच्या माध्यमातून नागरिकांना बेकायदेशीर गुंतवणूक योजनांची माहिती देत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांसारख्या सक्षम प्राधिकरणांची आवश्यक नोंदणी किंवा परवानगी नसतानाही गुंतवणूकदारांकडून रोख तसेच बँक व्यवहाराद्वारे पैसे स्वीकारले जात असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक श्रीकृष्ण पांडुरंग चव्हाण, कार्यकारी संचालक अंकुश शांताराम पार्टे, संचालक सुभाष पंदिरे आणि एजंट डॉ. सुदेश मोहिते यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींविरुद्ध पंतनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच बेकायदेशीर गुंतवणूक योजना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तपासादरम्यान पोलिसांनी कंपनीच्या विविध कार्यालयांसह आरोपींच्या घरांवर छापे टाकले. या कारवाईत १२ लाख ८ हजार रुपये रोख, नऊ बँकांची पासबुके, एक बीएमडब्ल्यू कार, एक वेरना कार तसेच सात लॅपटॉप आणि डेस्कटॉप जप्त करण्यात आले आहेत. आर्थिक गुप्तवार्ता पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक उमेश गौंड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुंतवणूक योजनेत आणखी किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, तसेच आर्थिक व्यवहारांचा नेमका विस्तार किती आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या