मुंबई, दादासाहेब येंधे : 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली नागरिकांना भीती दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभाग सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी संजय हेरालाल शहा, ऋषी रामचंद्र मिना, नौशादअली दिलशाद अली, मोहम्मद खलिद हाफिजुद्दीन सैफी, जगेश्वर महतो यांच्यासह एका महिलेचा आणि अन्य दोघांचा समावेश आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एकूण २७ मोबाईल, दोन लॅपटॉप, पाच डिजीटल साईन डिव्हाईस, ६१३ विविध कंपनीचे सिमकार्ड, दोन पासबुक, दोन एटीएम कार्ड तसेच गुन्ह्यांतील बँक खात्यात ठेवण्यात आलेली ३४ लाखांची कॅश जप्त केली आहे. या गुन्ह्यांतील सातही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.देशातील विविध राज्यांत एकाच वेळी विशेष मोहिमेअंतर्गत धाडी टाकत पोलिसांनी या टोळीतील ७ सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने एका नागरिकाला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून १ कोटी ६७ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली होती.
आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून त्यांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर एका मोठ्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात झाल्याचा बनाव रचला. तुमच्या बँक खात्यांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे आणि तुमच्या विरोधात सुप्रीम कोर्टातून अटक वॉरंट निघाले आहे, अशी भीती त्यांना घालण्यात आली होती.अटक आणि कायदेशीर कारवाईच्या दहशतीखाली आरोपींनी फिर्यादीला तब्बल १ कोटी ६७ लाख रुपये त्यांच्या विविध बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने मुंबई सायबर पोलिसांत धाव घेतली.
ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती गोळा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. ही माहिती काढल्यानंतर या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून एका महिलेसह ७ जणांना ताब्यात घेतले होते. तपासात संजय शहाने गुन्ह्यांतील आरोपींना सिमकार्ड, ओटीपी पुरविले होते. महिलेने गुन्ह्यांतील ५० लाख ६० हजाराची रक्कमेची विल्हेवाट लावली होती. याकामी तिला ऋषी मिनाने मदत केली होती. नौशाद अलीने गुन्ह्यांतील तक्रारदारांना संपर्क साधण्यासाठी सिमकार्ड मिळवून दिले होते. मोहम्मद खलीदने डिजीटल अरेस्टची धमकी देताना आलेले कॉल रुट करण्याचे काम केले, तर जगेश्वर महतो याने गुन्ह्यांतील फसवणुकीची १ कोटी १७ लाखांची कॅश बँक खात्यात स्विकारुन साथीदारांच्या मदतीने विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले.
पोलीस तपासात उघड झालेल्या या माहितीनंतर या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यावेळी या सातही आरोपींकडून पोलिसांनी विविध बँकेत गोठविण्यात आलेली ३४ लाखांसह मोबाईल, लॅपटॉप, डिजीटल साईन सर्व्हिसेस, सिमकार्ड, चेकबुक आणि एटीएम कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी यावेळी चार आरोपींना ११ ऑगस्ट तर तीन आरोपींना १७ ऑगस्टपर्यंत पोली कोठडी सुनावण्यात आले आहे. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

0 टिप्पण्या