Ticker

6/recent/ticker-posts

अमुल-गोकुळच्या नावाखाली गोरखधंदा, पिशव्या फोडून दूध काढायचे अन् घाण पाणी मिसळायचे, मोठया रॅकेटच्या आवळल्या मुसक्या

मुंबई, दादासाहेब येंधे : अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित दूध कंपन्यांच्या नावाचा वापर करून बनावट दूध पिशव्या तयार करणाऱ्या टोळीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. दहिसर पूर्व परिसरात कारवाई करून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.


या कारवाईत ४७० लिटर दूध, १३ हजार बनावट रिकाम्या पिशव्या, पिशव्या तयार करण्याची मशिनरी आणि अन्य साहित्य असा एकूण १० लाख ७९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दहिसर परिसरात अमूलच्या नावाच्या पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध भरून विकले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ ला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी दहिसर पूर्व येथे छापा टाकला. तेथे अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि गोकुळच्या पिशव्या कापून त्यातील काही दूध बाहेर काढले जात होते. त्यानंतर त्यात अस्वच्छ पाणी मिसळून पिशव्या पुन्हा सील केल्या जात होत्या. या पिशव्या अस्सल दूध असल्याचे भासवून विक्रीसाठी तयार केल्या जात होत्या.


रामूलू गुरुवर्य्य‌ बोडूपल्ली (६५) असे तेलंगणा येथून अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीचे नाव आहे. या अगोदर गुन्हे शाखेने दहिसर येथे एका ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अमूल आणि गोकुळ या नामांकित कंपनीचे भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी लिंगया भिक्षमया गंटा (४२), सैदुलु यादया जंगिली (३३) यादया चंद्रया बतुल्ला (३३) या तिघांना अटक करण्यात आली होती. 


या कारवाई नंतर गुन्हे शाखेने अमूल दूध कंपनीच्या बनावट पिशव्याचा पुरवठा करणाऱ्याची माहिती मिळवून रामूलू गुरुवर्य्य‌ बोडूपल्ली याला अटक करण्यात आली. रामुलू याने वसई पूर्व वाळीव फाटा येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज समोर असणाऱ्या बाबूभाई शहाणी कंपाउंड येथे छपाईचा कारखाना टाकला होता. या कारखान्यात अमूल दूध या कंपनीचे बनावट पिशव्यांची छपाई करून एक पिशवी अडीच रुपये दराने दुधात भेसळ करणाऱ्या टोळीला विकत होता अशी माहिती पोलीस उपायुक्त (डी-१) नवनाथ ढवळे यांनी दिली. 

रामुलू हा कोविड या महामारी पासून दुधात भेसळ करणाऱ्या टोळ्यांना बनावट पिशव्यांची विक्री करीत होता, महिन्याला ३० ते ५० हजार पिशव्या छापून तो दूध भेसळ करणाऱ्याना त्यांची विक्री करीत होता, २०२१ पासून जुलै २०२६ पर्यत त्याने जवळपास २० लाख पिशव्या छापून त्यांची विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी वसई पूर्व येथे छपाई कारखाना येथून पिशव्या तयार करणारी मशीन (किंमत १० लाख) जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (डी-१) नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-१२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील आणि पथकाने केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या