मुंबई, दादासाहेब येंधे : गुन्हे शाखेच्या कक्ष-१० पथकाने एमटीएनएलच्या जमिनीखालील कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत सुमारे १ कोटी ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी फरार आहेत.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ३० जून रोजी मालाड रोड परिसरात सापळा रचण्यात आला. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मुंबईतील विविध भागांत एमटीएनएलच्या जमिनीखालील कॉपर केबल चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोहेल शकील शाह (२०), अब्दुल रहीम अहमद शेख (२८), शेख एनायत मलिक (२८) आणि अफजल हसन खान (३५) यांचा समावेश आहे. आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी २,००० उखडलेले कॉपर केबलचे तुकडे (५८७ मीटर), दोन बोलेरो पिकअप वाहने, एक जेसीबी मशीन आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १,००,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासात आरोपींविरुद्ध चारकोप, समतानगर, आरे, गुन्हे शाखा आणि डिंडोशीसह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एमटीएनएल केबल चोरीचे सात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध आणि आणखी गुन्ह्यांचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

0 टिप्पण्या