मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात एका महापालिकेच्या कर्मचाऱ्याला गटार साफ करताना एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना एक धक्कादायक बाब समोर आली. या ८० वर्षीय महिलेच्या हत्येचा छडा लावत मुंबई पोलिसांनी मृत महिलेच्या भावाला आणि वाहिनीला बेड्या घातल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असून महिलेची ओळख पटू नये म्हणून तीचा मृतदेह हत्येनंतर गटारात फेकण्यात आला. पोलिसांनी सहार येथील रहिवासी जोसेफ थॉमस कोयलो आणि त्याची पत्नी मारिया जोसेफ कोयलो या दोघांना याबाबत अटक केली आहे. मृत महिलेचे नाव ब्लान्स जेम्स सिक्वेरा असे आहे.
अंधेरी पूर्व परिसरात मुंबई पालिकेचे कर्मचारी गटार साफ करीत असताना त्यांना एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. सुरुवातीला, मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र न सापडल्याने, साक्षीदार म्हणून भूमिका बजावणाऱ्या पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचा फोटो आणि वर्णन मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तसेच अंतर्गत व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले.
पोलीस तपास करत असताना त्यांना असे आढळून आले की, जानेवारी महिन्यात सहार पोलीस ठाण्यात एक वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. जेव्हा बेपत्ता महिलेच्या फोटोंची गटारात सापडलेल्या मृतदेहाशी तुलना केली गेली. तेव्हा मृत महिलेच्या हातातील बांगड्यांनी तिची ओळख पटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कुटुंबीयांनी दिलेल्या फोटोंमध्ये, त्या महिलेने त्याच बांगड्या घातल्या होत्या ज्या मृतदेहावर आढळल्या. शवविच्छेदन अहवालाने पुष्टी केली की महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून ती एक हत्या होती. या अहवालाच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी संशयाच्या आधारावर मृत महिलेचा भाऊ जोसेफ आणि वहिनी मारिया यांची चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांचे जबाब अत्यंत विसंगत असल्याचे आढळून आले. त्यांनी वारंवार आपले जबाब बदलले. कसून चौकशी केल्यानंतर, त्या जोडप्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात त्यांच्या घरी जोरदार वाद झाला होता. यावेळी त्यांनी ब्लँका सेक्वेरावर हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.

0 टिप्पण्या