मुंबई, (दादासाहेब येंधे) : पहाटेच्या वेळेस भाजी विक्रेत्यांना लुटणाऱ्या तिघांना माटुंगा पोलिसांनी नुकतीच अटक केली. अरबाज नासीर शेख ऊर्फ बाबूलाल, मोहम्मद रफिक अस्लम सिद्धीकी आणि फैजान हबीब जमादार अशी या तिघांची नावे आहेत.

या तिघांकडून पोलिसांनी एक चाकूसह सहा हजारांची रोकड जप्त केली आहे. ते तिघेही पहाटे चाकूचा धाक दाखवून पहाटे भाजी आणण्यास जाणाऱ्या भाजी विक्रेत्यांना लुटत होते.
शनिवारी पहाटे पाच वाजता तक्रारदार हे त्यांच्या मित्रासोबत दादर मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी पायी जात होते. फाईव्ह गार्डनजवळ येताच तिथे एक स्कूटी आली आणि स्कूटीमधील तिघांनी त्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. त्यानंतर या तिघांनी त्यांच्याकडील सुमारे तीस हजार रुपयांची कॅश घेऊन पळून गेले.

हा घडलेला प्रकार तक्रारदारांनी माटुंगा पोलिसांना सांगून तीनही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून या पथकाने २४ तासांत पळून गेलेल्या तिन्ही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या तिघांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
यातील अरबाज हा रस्त्यावर कपडे विक्रीचे, मोहम्मद रफिक डिलीव्हरी बॉय तर फैजान हा मोबाईल कव्हर विक्रेता म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा