Ticker

6/recent/ticker-posts

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात अडथळा ठरणारी ५५ अनधिकृत बांधकामे तोडली

कारवाईनंतर सदर भागातील रस्त्याची रुंदी ३० मीटर वरुन वाढून ४५.७५ मीटर   

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाच्या धडक कारवाईमुळे प्रकल्पास होणार मदत ! 


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा ‘गोरेगाव - मुलुंड जोडरस्ता’ अर्थात ‘गोरेगाव - मुलुंड लिंक रोड’ (GMLR) हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी, एक महत्त्वाचा प्रकल्प ! सुमारे १२.२ किलोमीटर लांबीच्या या मार्गाच्या रस्ता रेषेत (Road Line) काही ठिकाणी उद्भवलेली अनधिकृत बांधकामे हटविणे प्रकल्पासाठी गरजेचे आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ‘एस विभाग’ कार्यक्षेत्रातील सुदर्शन हॉटेल ते तुळशेतपाडा या सुमारे अर्धा किलोमीटर लांबीच्या भागात उद्भवलेली ५५ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. या कारवाईपूर्वी सदर भागातील रस्त्याची रुंदी ही सुमारे ३० मीटर इतकी होती, तर आता कारवाईनंतर ती रुंदी ४५.७५ मीटर अर्थात रस्ता रेषेइतकी झाली आहे. ‘एस’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाईनंतर मोकळ्या केलेल्या सदर भागाचा ताबा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याकडे देण्यात आला आहे, अशी माहिती ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.  


याबाबत अधिक माहिती देताना श्री. आंबी यांनी सांगितले की, परिमंडळ ६ चे उपआयुक्त श्री. देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार व आवश्यक त्या प्रक्रियेअंती करण्यात आलेल्या धडक कारवाईसाठी २ जेसीबींसह आवश्यक ती यंत्रसामुग्री प्रभावीपणे वापरण्यात आली. या कारवाईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागाचे कार्यकारी अभियंता भास्कर कसगीकर, दुय्यम अभियंता (रस्ते) सचिन डाऊर, सहाय्यक अभियंता (परिरक्षण) राहुल जाधव, दुय्यम अभियंता (रस्ते) श्रीमती कल्पना कोतवाल यांच्यासह २५ कामगार - कर्मचारी - अधिकारी यांचा समावेश असलेली २५ व्यक्तिंची चमू अव्याहतपणे कार्यरत होती. या कारवाईनंतर मोकळ्या करण्यात आलेल्या भागात उड्डाणपुलांचे बांधकाम प्रस्तावित असल्याने सदर भागाचा ताबा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल खात्याकडे सोपविण्यात आला आहे. ‘एस’ विभागाद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गोरेगांव - मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या अंमलबजावणीस मदत होणार आहे. 


 जसंवि/ ३४६


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या