वडाळा येथील कॉल सेंटर उध्वस्त, ११ जणांना अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : शेअर्समधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आम्हीच दाखवत भारतासह परदेशातील दोन ते तीन हजार नागरिकांचे कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. वडाळा येथे ट्रेड ग्लोबल मार्केट अंतर्गत त्यांचे सुरू असलेले कॉल सेंटरही गुन्हे शाखेने उध्वस्त केले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-३ ने ही कारवाई केलेली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार आरोपींकडून वडाळा येथील अँटॉप हिल वेअर हाऊस मध्ये 'ट्रेड ग्लोबल मार्केट' ही मंडळी भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांना इंटरनेट द्वारे कॉल करायचे. कॉलर ट्रेड ग्लोबल मार्केट या कंपनीच्या वेबसाईटवरून फॉरेक्स शेअर्स करन्सी आणि कमोडिटी ट्रेडिंग करण्याबाबत यूके बेस कंपनीतून बोलत असल्याचे सांगून कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने छापा टाकून याचा पर्दाफाश केला आहे. आरोपी हे कॉल सेंटर मधून ते युके दिल्ली व मुंबई येथून बोलत असल्याचे भासवून परदेशातील व भारतातील नागरिकांना झॉईपर सॉफ्टवेअर कॉल करून प्रत्येक ग्राहकाला कमीत कमी पाचशे ते हजार डॉलर इतकी रक्कम क्रेडिट करायला सांगून चांगला परताव्या देण्याचे आमिष दाखवायचे. पुढे रक्कम क्रेडिट होताच ती परत न करता फसवणूक करत होते.
कारवाईदरम्यान ही मंडळी कोणतेही परवाने न घेता अनधिकृत कॉल सेंटर चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यांनी आतापर्यंत दोन ते तीन हजार ग्राहकांशी संपर्क साधून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून १५ लॅपटॉप, १ डेस्कटॉप, २ राऊटर, १ स्कॅन मशीन व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, प्रभारी पोलीस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी शामराव पाटील, सोनाली भारते, समीर मुजावर, आरिफ पटेल, सुधीर पालांडे आणि अंमलदार अरुण घाटकर, अनभुले, मांगले, कांबळे, भोजने, कुमकर, मोरे, तांबडे यांनी ही कारवाई केली आहे.
0 टिप्पण्या