घरच्यांशी झालेल्या भांडणाचा पोलिसांना ताप, सोलापूरच्या तरुणाला अटक
मुंबई, दि. २३: साहेब, झवेरी बाजारातील खाऊगल्ली परिसरात बॉम्ब ठेवण्यात आला असून मोठा घातपात होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जीवित हानी व वित्त हानी होणार आहे. असा कॉल सोमवारी पोलीस नियंत्रण कक्षामध्ये आला आणि क्षणार्धात पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी तत्काळ संबंधित परिसर रिकामा केला. सर्व परिसराची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीत काहीच आढळले नाही. अखेरीस कोणीतरी जाणूनबुजून खोटा कॉल केल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे एकाला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याचे नाव दिनेश सुतार (वय २४) असे असून घरच्यांशी भांडण झाल्याचा राग मनात ठेवून त्याने हा खोटा कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी लोकमान्य टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी खाऊ गल्ली परिसर पूर्ण रिकामा केला. बॉम्बशोधक पथकाने परिसराची कसून तपासणी केली. मात्र, कुठेच काही आढळले नाही. बॉम्ब बाबत माहिती देणाऱ्याकडून काही मिळते का म्हणून पोलिसांच्या एका पथकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने फोन कट केल्याने पोलिसांचा संशय बाळवला. त्याच्या मोबाईल लोकेशन वरून भुलेश्वर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आपले नाव दिनेश सुतार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. झवेरी बाजारात कोणताही बॉम्ब ठेवला नसल्याचे दिनेशने स्पष्ट केले.
मूळचा सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चोपडे गावचा सुतार हा बेरोजगार आहे. गावी घरच्यांशी भांडण झाल्याने तो सांगलीवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी मुंबईत आला. पूर्वी काम करणाऱ्या काळबादेवी येथील शकुंतला बिल्डिंगजवळील एका दुकानाबाहेर राहत असल्याचे दिनेश सुतारने पोलिसांना सांगितले.
फेसबुक द्वारे ओळख झालेल्या अहमदनगर येथील महिलेने त्रास दिल्याने दिनेशने झवेरी बाजारच्या कॉलपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह जामखेड पोलिसांनाही कॉल करून जामखेड परिसरात बॉम्ब ठेवल्या असल्याची अफवा पसरवली होती.असे चौकशीत आढळून आले आहे. अखेर त्याला अटक करण्यात आली असून पोलीस सुतारची कसून चौकशी करत आहेत.

0 टिप्पण्या