Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी सल्लागार समिती गठीत

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचा सल्लागार समितीमध्ये समावेश


विविध आरोग्य सेवा-सुविधा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी समिती कार्य करणार


मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांना विविध आरोग्य सेवा-सुविधा देखील सातत्याने व परिणामकारकरित्या देत असते. या सुविधा देत असतानाच आरोग्य विषयक नवनवीन अत्याधुनिक बाबींची उपलब्धता व अंमलबजावणी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला मार्गदर्शन करणे, जेणेकरुन आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा या सक्षमपणे आणि समर्थपणे नागरिकांना मिळाव्यात, या हेतूने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार एका विशेष सल्लागार समितीचे गठन आज करण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेत या सल्लागार समितीची पहिली बैठक बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. या समितीद्वारे प्रथम आराखडा (Vision Document) हा साधारणपणे पुढील दीड महिन्यात महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे. 


या समितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, टाटा समाज विज्ञान संस्थेचे (TISS) माजी अधिष्ठाता डॉ. टी. सुंदररामन, युनिसेफच्या प्रकल्प संचालिका डॉ. (श्रीमती) राजेश्वरी चंद्रशेखर, ‘नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर’चे सल्लागार तथा केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील माजी उपायुक्त डॉ. हिमांशू भूषण, राज्याच्या माजी आरोग्य संचालक डॉ. (श्रीमती) अर्चना पाटील यांचा समावेश आहे. तसेच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या (के. ई. एम.) अधिष्ठाता डॉ. (श्रीमती) संगीता रावत, नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण राठी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे आणि प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) डॉ. विद्या ठाकूर या तज्ज्ञ मंडळींचा सदस्य म्हणून समितीत समावेश असणार आहे. 


या समितीचे नामाभिधान ‘आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी सल्लागार समिती’ (Advisory Committee for Improvement of Health Services Infrastructure) असे करण्यात आले आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य विषयक सक्षमीकरणासाठी या प्रकारची सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणा-या विविध आरोग्य सेवा-सुविधांचे अधिकाधिक सक्षमीकरण करणे आणि नागरिकांना सातत्याने अधिकाधिक चांगल्या आरोग्य सेवा-सुविधा प्रदान करणे, हा या समितीच्या कामकाजाचा प्रमुख हेतू आहे. या अनुषंगाने आज झालेल्या बैठकी दरम्यान आरोग्य व संबंधित पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाबाबत विविध स्तरिय चर्चा करण्यात आली. तसेच या अनुषंगाने समितीद्वारे प्रथम आराखडा (Vision Document) हा साधारणपणे एक ते दीड महिन्यात महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्याचे आजच्या बैठकी दरम्यान निश्चित करण्यात आले.


आजच्या बैठकी दरम्यान समितीची उद्दीष्टे, कार्यवाही इत्यादींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा मुद्देनिहाय संक्षिप्त गोषवारा पुढीलप्रमाणे – 


१. महानगरपालिका क्षेत्रात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १९० दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये प्रायोगिक स्तरावर ‘टेलि-कन्सल्टेशन’ सुरु करणे. तसेच सुसमन्वय साधण्यासाठी अत्याधुनिक व प्रभावी सॉफ्टवेअरचा वापर करणे. 


२. विविध आजारांच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणा-या लसीकरणात गुणवत्तापूर्ण वाढ करणे. 


३. असंसर्गजन्य रोगांचे (NCDs) निदान व उपचार अधिकाधिक प्रभावी करणे. 


४. माता व बाल मृत्यू दर आणखी कमी करण्यासाठी विविध स्तरिय उपाययोजना राबविणे. 


५. प्रसुति-पूर्व व प्रसुति-पश्चात घ्यावयाची काळजी, याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध स्तरिय कार्यवाहीची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करणे. 


६. बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न कालबद्धरित्या राबविणे. 


७. सार्वजनिक आरोग्य खात्यात कार्यरत असणा-या डॉक्टर व कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे.


८. महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणा-या ‘आशा’ सेविकांचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरण करणे. 


९. आरोग्य विषयक काही सेवा-सुविधांच्या अंमलबजावणीसाठी विविध प्रमंडळांच्या (Corporate Company) सामाजिक उत्तरदायित्व निधी (Corporate Social Responsibility) चा उपयोग करणे.

१०. आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी काल-सुसंगत धोरणे तयार करणे, त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा, मार्गदर्शक तत्त्वे, मानदंड (Norms) आणि मानके (Standard) तयार करणे. 


११. आरोग्य विषयक संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करणे. 


१२. आवश्यक तेथे अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान आधारित बाबींचा अधिकाधिक परिणामकारक अवलंब करणे. 


१३. सक्षमीकरण, तांत्रिक सहाय्य आणि विकेंद्रीत सुव्यवस्थापन साध्य करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला मदत व मार्गदर्शन करणे.  


१४. या समितीची बैठक ही साधारणपणे दर दोन महिन्यातून एकदा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, आवश्यकतेनुसार बैठकीची वारंवारिता सुधारित करण्यात येईल.


सदर बैठकीला उपस्थित असणा-या मान्यवरांची महत्त्वाची वक्तव्ये पुढीलप्रमाणे – 


डॉ. सुभाष साळुंके – आरोग्य समस्यांच्या निर्मूलनासाठी केंद्रीत कार्यक्रम (Focused Programme) राबविणे गरजेचे असून खासगी आरोग्य क्षेत्राचा प्राथमिक आरोग्य सेवेसाठी कसा उपयोग करता येईल, याचा विचार घेणे गरजेचे आहे. 


डॉ. अविनाश सुपे – संदर्भ सेवा (Referal System) अधिक सक्षम व नियोजित करण्यासाठी, प्राथमिक स्तरावरील वैद्यकीय अधिकारी तसेच निम्न-वैद्यकीय वर्गाचे प्रशिक्षण तसेच टेलिमेडिसिन सुविधा सुरु करण्याची गरज आहे. तसेच प्रमुख रुग्णालयातील वैद्यकीय सेवांव्यतिरिक्त इतर सेवा प्रभावी करण्याची गरज असल्याचे आणि अत्यावश्यक सेवेचे वर्गीकरण करण्याची आवश्यकता आहे. 


डॉ. राजेश्वरी चंद्रशेखर – स्थलांतरित नागरिकांच्या आरोग्य सेवेकडे लक्ष वेधून सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील आरोग्य सेवांसाठी ‘युनिफाईड डेटा सिस्टिम’ असणे गरजेचे आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणा-या आरोग्य विषयक सोयी-सुविधांबाबत सहकार्य करण्यासाठी युनिसेफ उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले. 


डॉ. टी. सुंदररामन – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेच्या परिस्थितीचे विश्लेषण (Situational Analysis) करण्यासोबतच प्रमुख रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची गरज.  


जसंवि/२२४


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या