Ticker

6/recent/ticker-posts

भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त

आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल युनिटची चेंबूर बदलापूर भिवंडी, नवी मुंबईत कारवाई

मुंबई : आरोग्यास हानिकारक असलेल्या भेसळयुक्त पनीर विक्रीचा चेंबूर येथे सुरू असलेला गोरखधंदा आर्थिक गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल पथकाने उध्वस्त केला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी, बदलापूर, नवी मुंबई येथील कारखान्यांवर छापा टाकून एकूण दोन हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त केला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चेंबूर येथील काही डेअरी मालकांकडून भेसळयुक्त पनीरची विक्री केली जात असल्याची खबर सीबी कंट्रोल युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील, एपीआय रोहित सावंत, रुपेश दरेकर तसेच गणेश डोईफोडे, महेश नाईक, महेंद्र दरेकर, संतोष पवार, शेखर भंडारी व पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकासह चेंबूर कॉलनीतील डेअरी पंजाब वर छापा टाकला. त्यावेळी या डेअरी  समोर उभ्या असलेल्या दोन पिकअप टेम्पो मध्ये ६३१ किलो हलक्या प्रतीचा पनीरचा साठा सापडला. अन्न व औषध प्रशासन विभागाने त्या पनीरच्या नमुन्याची तपासणी केली असता आरोग्यास हानिकारक हलक्या दर्जाचे पनीर असल्याचा अहवाल आला. त्यामुळे डेअरी मालकाबरोबरच भेसळयुक्त पनीरचा पुरवठा करणाऱ्या बदलापूर येथील मेसर्स यशोदा ऑर्गनिक फुड प्रायव्हेट लिमिटेड आणि भिवंडी येथील मे.दिशा डेअरी या कारखान्यांच्या मालकाविरुद्ध चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सेबी कंट्रोलच्या चार पथकांनी बदलापूर, भिवंडी आणि नवी मुंबई येथील कारखान्यांवर टाकले. त्यावेळी त्या ठिकाणी पाम तेलाचे भरलेले ९५ डबे, ३० पोटी दूध पावडर आणि पंधराशे किलो भेसळयुक्त पनीरचा साठा सापडला.


याप्रकरणी पोलिसांनी एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या सात जणांना कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी हे दूध न वापरता दुधाची पावडर, हलक्या दर्जाचे पामतेल व केमिकलचे मिश्रण करून आरोग्यास घातक असे पनीर बनवायचे. हे पनीर विविध रेस्टॉरंट, हॉटेल तसेच केटरिंग व्यवसायिकांना मलाईयुक्त पनीर सांगून विकत होते, असे तपासात पुढे आले आहे.


















Press note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या