१ हजार ३२५ जाहिरात फलक हटवले ,एकूण ९४ किलो खिळे काढले
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या वृक्ष संजीवनी मोहीम अंतर्गत आतापर्यंत ९८३ वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले आहे, तर एकूण १ हजार ३२५ जाहिरात फलक हटवले असून तब्बल ९४ किलो खिळे काढण्यात आले आहेत. विविध संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्या सहकार्याने सुरु असलेल्या या मोहिमेने वेग धरला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दिनांक २२ एप्रिल रोजी येणाऱया जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘वृक्ष संजीवनी अभियान’ राबविण्यात येत आहे. सन १९७० पासून दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरात विविध पर्यावरणविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षीच्या जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून उद्यान खात्यामार्फत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या २४ विभागांमध्ये वृक्ष संजीवनी मोहीम विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे.
वृक्ष संजीवनी मोहिमेदरम्यान वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढून लालमाती टाकणे, वृक्षांवरील खिळे, पोस्टर, बॅनर, केबल्स काढून वृक्षांना मोकळा श्वास मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. खिळे, पोस्टर, विद्युत रोषणाई, केबल इत्यादींमुळे वृक्षांना इजा होते व त्याठिकाणी झाडाचे खोड कुजून वृक्ष मोडून पडण्याची अथवा मृत होण्याची शक्यता असते. तसेच मुळांभोवती काँक्रिटीकरण केल्यामुळे मुळांची वाढ खुंटते व जमिनीत पाणी न शोषल्याने वृक्ष मृत होण्याची शक्यता असते. या कारणाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वृक्ष संजीवनी मोहीम दिनांक १८ एप्रिल २०२२ ते दिनांक २३ एप्रिल २०२२ या कालावधीत हाती घेण्यात आली आहे. आजमितीपर्यंत एकूण ९८३ वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले असून, ६ हजार १७८ वृक्षांवरील खिळे / जाहिरात फलक काढण्यात आले आहेत. एकूण ९४.१९४ किलो खिळे काढण्यात आले असून १ हजार ३२५ जाहिरात फलक हटवण्यात आले आहेत. या मोहिमेत पार्ले वृक्ष मित्र, एकता मंच, रिव्हर मार्च एलएसीसी, अंघोळीची गोळी सारख्या सामाजिक संस्था, विविध शाळा, महाविद्यालये यांनी भाग घेतला आहे. तसेच विद्यार्थी व नागरिकांमध्ये मोहिमेबाबत जनजागृती ही करण्यात येत आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
जसंवि/०३०




0 टिप्पण्या