Ticker

6/recent/ticker-posts

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम

विविध १० यंत्रणांसह २०० व्यक्तींचा सहभाग आणि अत्याधुनिक सामुग्रीचा वापर

बॉम्ब स्फोट, बचाव कार्य या अनुषंगाने विविध

पथकांचा एकत्रित सराव

काल दुपारी ३ वाजताच्या सुमारास ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे एका अनोळखी बॅगेतील बॉम्बचा अचानक स्फोट होतो. सदर स्फोटावेळी तेथे पर्यटनासाठी आलेली ५० माणसे जखमी होतात. मुंबई पोलीसांना घटनेची माहिती प्राप्त होताच, पोलीस व बॉम्बशोध पथक, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागाचे पथक, मुंबई अग्निशमन दल, ‘१०८’ रुग्णवाहिका इत्यादी यंत्रणा त्वरीत घटनास्थळी दाखल होतात. बॉम्बशोध पथकाने एकच बॉम्ब असल्याचे परंतु जवळपास अणुनैसर्गिक घटक असण्याची शक्यता वर्तवतल्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे ‘हॅजमॅट’ वाहन ही तिथे पोहचते. त्याचवेळी बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या १५ व्यक्तींना ‘१०८’ रुग्णवाहिकेतून जे. जे. रुग्णालयात व नायर रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात येते. दरम्यान घटनास्थळाजवळ अणुनैसर्गिक घटक असल्याचे घोषीत करण्यात येते. 



अणुनैसर्गिक घटक सापडल्याने अतिरिक्त मदतीकरिता अंधेरी संकुल स्थित राष्ट्रीय आपत्ती पथकाच्या एका तुकडीस आणि ‘बीएआरसी’च्या ‘क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुप’च्या अधिका-यांनाही ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात पाचारण करण्यात येते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक घटनास्थळी पोहोचून रेडीएशनचे प्रमाण तपासते, बाधीतांपैकी १० लोकांच्या कपड्यावर रेडीएशन आढळल्यामुळे त्यांना decontamination केले जाते. रुग्णालयात पोहोचलेल्या १५ जखमींना अणुनैसर्गिक आणीबाणीच्या दृष्टीने विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. जखमींना जास्त इजा पोहोचली नसली तरी निरिक्षणाकरिता त्यांना रुग्णालयात वेगळ्या कक्षात विलगीकरण करुन दाखल करुन घेतले जाते. एनडीआरएफ, बीएआरसी यांच्या सल्ल्याने अणुनैसर्गिक घटक ताब्यात घेऊन त्यास योग्य वेष्टनात सुरक्षितरित्या ठेवून वैज्ञानिकरित्या विल्हेवाट लावण्याकरिता  महापालिका अधिका-यांच्या ताब्यात देण्यात येते. 



सरतेशेवटी वरील सर्व बाबी या आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या रंगीत तालमीचा भाग असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी घोषित केले. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ चा संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची माहिती देतानाच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील सर्व सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच या घटनेत सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीला काहीही दुखापत झालेली नाही किंवा या सरावा दरम्यान कोणीही जखमी झालेले नाही. तसेच या धर्तीवर भविष्यात देखील विविध आपत्तींविषयीची रंगीत तालिम नियमितपणे घेण्यात येईल. जेणेकरुन, आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत संबंधीत यंत्रणांना आपत्ती प्रसंगी सुसमन्वय साधण्याचा सराव होईल, असेही श्री. सुरेश काकाणी यांनी यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आवर्जून नमूद केले आहे.




याबाबत अधिक माहिती देताना श्री. काकाणी यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत भारतातील मुख्य ७५ ऐतिहासिक ठिकाणी रंगीत तालीम (Mock Exercise) आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने निश्चित केलेल्या देशभरातील ७५ प्रमुख ऐतिहासिक ठिकाणांमध्ये मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे ठिकाणही निर्धारित करण्यात आले आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांना रंगीत तालीम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या रंगीत तालमीचा उद्देश विविध यंत्रणांमधील समन्वय कार्यवाहीचे बळकटीकरण करणे आणि त्यांच्या आपत्ती सज्जतेची तयारी तपासणे हा आहे. 



बृहन्मुंबईतील आपत्ती व्यवस्थापनाकरिता नोडल यंत्रणा म्हणून काम करणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत दिनांक ०४ मार्च २०२२ रोजी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे “बॉम्बस्फोट व अणुनैसर्गिक घटकांचा वापर” असा आशय असलेल्या घटनेवर रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. या सरावात विविध १० यंत्रणांच्या सुमारे २०० व्यक्तिंनी सहभाग नोंदविला. 



या रंगीत तालमीबाबत अधिक माहिती देताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे माहिती देण्यात आली की, या सरावामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF), बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, बॉम्बशोध पथक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘ए’ विभाग, भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर्सचे अधिकारी (BARC), नागरी संरक्षण दल व गृहरक्षक दल, ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची व राज्य शासनाची रुग्णालये यांना समाविष्ट करुन घेण्यात आले. बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची व पर्यटकांची भूमिका पार पाडण्याकरिता किशनचंद चेलाराम (के. सी.) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील (एनएसएस) ५० स्वयंसेवकांचीही मदत घेण्यात आली. 


‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे आयोजित या रंगीत तालमीचे निरिक्षण करण्याकरिता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. प्रभात रहांगदळे हे उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक श्री. महेश नार्वेकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. हेमंत परब, सहाय्यक आयुक्त श्री. शिवाजी गुरव, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे उप समादेशक श्री. आशिषकुमार, कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी, १०८ रुग्णवाहिकेचे समन्वयक,  बीएआरसीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली गोडसे यांनी प्रत्यक्ष भाग घेतला. रंगीत तालमीत भाग घेणा-या यंत्रणांनी सुनिश्चित कार्यपध्दतीनुसार त्यांच्या भूमिका पार पाडल्या किंवा नाही, अजुन कोणत्या बाबतीत प्रतिसाद कार्य प्रभावी होणे आवश्यक आहे याचे मुल्यमापन करण्याकरिता नियुक्त अधिकारी म्हणून केईएम रुग्णालयाचे सेवानिवृत्त अधिष्ठाता श्री. हेमंत देशमुख, केईएम रुग्णालयातील विभागप्रमुख डॉ अमिता आठवले, अधिष्ठाता डॉ. शैलेष मोहिते, आपत्ती व्यवस्थापन खात्याचे सेवानिवृत्त प्रमुख अधिकारी विलास वैद्य यांनी काम पाहिले, अशीही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली आहे.  
















(जसंवि/ ६०५)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या