चोरलेलेले मोबाईल विक्रीसाठी न्यायचे उत्तरप्रदेशात
मुंबई, दादासाहेब येंधे : अंधेरी चार बंगला परिसरात पहाटेच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या टोळीला वर्सोवा पोलिसांनी गजाआड केले आहे. सुखविंदर सिंग भाटिया, जॅकी सिंग आणि अक्षय भारती अशी त्यांची नावे आहेत. त्या तिघांकडून चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दिनेश मढवी आणि रणजितकुमार यादवला देखील अटक करण्यात आली आहे. चोरीचे मोबाईल रणजितकुमार हा स्वस्तात विकत घेऊन तो जास्त किमतीत उत्तर प्रदेशला विक्रीसाठी पाठवत असायचा.
चार बंगला परिसरात रो हाऊस प्रकारची घरे आहेत. तेथे काहीजण हे चित्रपट क्षेत्राशी तर काहीजण पेईंग गेस्ट म्हणून राहतात. रात्रभर काम केल्यानंतर ते पहाटे घरी येऊन सकाळी झोपतात. सकाळी झोपेत असताना एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर तिथे तिघेजण आत शिरून हातसफाई करायचे. कॉलेज तरुणांप्रमाणे वेशभूषा केल्याने त्यांच्यावर कोणीही संशय घेत नव्हते. गेल्या तीन महिन्यांत या टोळीने चार बंगला परिसरात दोन ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. त्याची दखल वर्सोवा पोलिसांनी घेतली. परिमंडळ-९ चे उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन सूर्यवंशी, विवेक ढवळे आणि पथकाने तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये पोलिसांना सुखविंदर सिंग दिसला. हे चोरटे वाकोला परिसरात असल्याची माहिती समजताच पोलिस तेथे पोहोचले. तेथून सुखविंदरसिंग आणि जॅकीला अटक केली. त्या दोघांच्या चौकशीत अक्षयचे नाव समोर आले. या टोळीकडून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप हस्तगत केले आहेत. चोरलेले मोबाईल ते दिनेशला देत असायचे. तर रणजित हा दिनेशकडून मोबाईल घेऊन तो विक्रीसाठी उत्तरप्रदेशला पाठवायचा. अक्षय आणि सुखविंदरसिंग हे दोघे चुलत भाऊ असून ते चोरीच्या पैशात महागडे कपडे विकत घेत बाकीच्या पैशातून हुक्का पार्लरमध्ये जायचे. चोरलेले मोबाईल हे मोटरसायकलमध्ये लपवून ठेवत असत, तर लॅपटॉप घरी ठेवत होते. चोरीच्या गुन्ह्यात या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.
0 टिप्पण्या