मुंबई : प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
जळगाव येथील शिवांगी काळे हिने 'वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने 'नव संशोधन' मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने 'क्रीडा' श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
जळगाव येथील शिवांगी काळे हिची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासठी निवड झाली. लहान वयातच धाडस आणि समयसूचकतेचा परिचय देत विजेच्या धक्क्यापासून शिवांगीने आपल्या आई व बहिणीचे प्राण वाचविले.
पुणे येथील जुई केसकर हिची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. जुईने पार्किन्सन रोगग्रस्तांना उपयुक्त ठरतील असे मोजे सदृष्य उपकरण तयार केले असून यास ‘जे ट्रेमर ३ जी’ असे नाव देण्यात आले आहे.
मुंबई येथील रिया राय हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. १३ वर्षीय रिया ही दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वाटर पॅरा स्विमींग आणि ओपन वाटर स्विमींग मध्ये जागतिक विक्रम प्रस्थापीत केला आहे.
नाशिक येथील स्वयंम पाटील याची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. स्वयंमने वयाच्या १० व्या वर्षी ५ कि.मी. अंतर पोहून तर १३ व्या वर्षी १४ कि.मी. अंतर पोहून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
0 टिप्पण्या