इतरही गुन्ह्यांची उकल
मुंबई, दादासाहेब येंधे : नशा करण्यासाठी मोबाईल चोरी करणाऱ्या अद्वैत शिंदे आणि चंदू मामुनकर या दोघांना निर्मलनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी यासाठी ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. वांद्रे परिसरात राहणारी मीनाक्षी या तक्रारदार महिला पाच दिवसांपूर्वी पश्चिम द्रूतगती महामार्गावरील सर्विस रोड परिसरातून जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणाने तिच्याकडील मोबाईल घेऊन पलायन केले. निर्मल नगर पोलिस ठाणेत मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भंडारे यांच्या पथकाने या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यातील अद्वैत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो गेल्या पाच वर्षांपासून अशाप्रकारे मोबाईल चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक मोबाईल चोरीसह इतर गुन्ह्यांची नोंद आहे.
0 टिप्पण्या