अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

demo-image

अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा

पोलीस आयुक्तांचा आदेश, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना

मुंबई, दादासाहेब येंधे : साकीनाका बलात्कार प्रकरणामुळे मुंबई हादरली असताना पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून विशेष खबरदारी घेत गस्तीवर भर दिला जात आहे. अंधाराच्या तसेच निर्जनस्थळी क्यूआर कोड लावून गस्त वाढविण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांना दिले आहेत.

पोलीस आयुक्तांनी परिपत्रक काढून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आयुक्तांनी दिलेल्या माहितीत साकीनाका घटनेच्यावेळी पोलिसांचा प्रतिसाद १० मिनिटांचा होता. अशा घटनांमध्ये नियंत्रण कक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून कोणताही कॉल विशेषतः महिलांच्या संदर्भातील कॉलकडे दुर्लक्ष करू नका. तत्काळ प्रतिसाद देत योग्य ती खबरदारी घ्या. तसेच नियंत्रण कक्षाच्या प्रभारी अधिकारी यांनी यावर सतत लक्ष ठेवावे असे त्यांनी सांगितले.

पोलीस ठाणे हद्दीतील अंधाराच्या ठिकाणी तसेच निर्जन ठिकाणांचा आढावा घेऊन निर्जनस्थळी गस्त वाढविणे गरजेचे आहे. सर्व ठिकाणी महापालिकेसोबत पत्रव्यवहार करून सीसीटीव्ही तसेच लाईटसाठी पाठपुरावा करावा. अशा ठिकाणी क्यूआर कोड लावून रस्त्यावरील वाहने, गस्त करणारे पोलिस अधिकारी अंमलदार यांनी यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून वेळीच अनुचित प्रकार टाळता येईल. शिवाय प्रसाधन गृहाबाहेरही लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. संशयितांकडे चौकशी करत योग्य ती कारवाई करावी असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.

रात्री गस्तीदरम्यान एकटी महिला दिसताच तिला तात्काळ मदत करावी. अमली पदार्थाची नशा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. शिवाय रस्त्यावर बरेच दिवसांपासून उभा असलेला टेम्पो, ट्रक व गाड्यांच्या मालकांचा शोध घेऊन वाहने त्यांना तेथून काढण्यास सांगावे. अन्यथा पुढील कारवाई करावी, अशा सूचनाही आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

Police


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *