Ticker

6/recent/ticker-posts

गोदामावर डल्ला मारणारे चोरटे गजाआड

मुंबई, दादासाहेब येंधे : शिवडी पूर्व माइलस्टोन कंपनीतील एका शीतपेयाच्या गोदामावर डल्ला मारून हजारो रुपयांचे शीतपेयांचे बॉक्स घेऊन पोबारा करणाऱ्या चोरट्यांना शिवडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. सुरेश कंदप्पा देवेंद्र (वय २८), सुशील अशोक कांबळे(वय१९), आकाश मगर (२४) अशी त्यांची नावे असून यावर त्यांच्यावर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात २६ जुलै च्या मध्यरात्री फिर्यादी संबंधित कंपनीचे व्यवस्थापक गोदामाचे कुलूप बंद करून घरी गेले असताना सदर चोरट्यांनी सुरक्षारक्षकाची नजर चुकवून गोदामाच्या लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून गोदामात प्रवेश करून रेड बुल एनर्जी ड्रिंकचे ८ बॉक्स उचलून पोबारा केला होता. दरम्यान फिरतीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाची नजर पडताच त्याने कंपनीच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सकाळी व्यवस्थापकाला चोरीची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी कंपनी गाठून गोदामातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून शिवडी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.

१३ ऑगस्ट रोजी गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक किरण मांढरे हे आपल्या पथकासह केटी कंपाऊंड परिसरात रात्रीच्या वेळेस गस्त करत असताना दोन तरुण रेड बुल शीतपेय पीत बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहून दोघेही पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना जागेवरच पकडले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला अटक केली. या तिघांनीही गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या