Ticker

6/recent/ticker-posts

"सांबर" या वन्य प्राण्याचे शिंग विक्रीस आलेल्या महिलेसह दोघांना अटक

सांबराची शिंगे विकण्यासाठी आलेल्या महिलेसह दोघांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : सांबर या संरक्षित वन्य प्राण्याची दोन शिंगे विकण्यासाठी आलेल्या महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून युनिट-४ च्या पोलिसांना अशी माहिती मिळाली की, सायन येथील र. व. आयुर्वेदिक रुग्णालयाजवळ एक महिला व एक इसम सांबर या वनसंरक्षक प्राण्याची शिंगे विकण्यासाठी सायंकाळी ४.४५ वाजेच्या दरम्यान येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह सापळा लावून रिक्षातून आलेल्या महिलेसह दोघांना ताब्यात घेतले. महिलेच्या हातात असलेल्या पॉलिथिनच्या पिशवीची पाहणी केली असता प्रत्येकी दोन किलो वजनाचे सांबर या प्राण्याची शिंगे आढळून आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली शिंगे ही वन्य संरक्षित सांबर या प्राण्याची असल्याचे खात्रीशीर सांगितले. त्यानुसार यातील महिलेसह दोघांविरोधात सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींनी ती शिंगे कोठून व कोणासाठी आणली होती, याचा तपास सुरू आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या