Ticker

6/recent/ticker-posts

माहूलमधील वैद्यकीय प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून संयंत्रांसह दीड किमीची वाहिनी

·        अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू यांच्या उपस्थितीत संयंत्रे महानगरपालिकेला सुपूर्द
·        संयंत्रे व दीड किमीची प्राणवायू वाहिनी मिळून बीपीसीएलकडून ४ कोटींचे सहकार्य
·        या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम पुरवणार प्रतिदिन १० ते १५ मेट्रिक टन प्राणवायू
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एम पश्चिम विभागातील माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय प्राणवायू जंबो सिलिंडर पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबई रिफायनरीने सुमारे ४ कोटी रुपयांची संयंत्रे दान स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहेत. ही संयंत्रे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनच्यावतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी स्वीकारली.

चेंबूर परिसरातील माहूल येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) च्या मुंबई रिफायनरीमध्ये आज (दिनांक २६ ऑगस्ट २०२१) सकाळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ही यंत्रणा महानगरपालिका प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली. बीपीसीएल मुंबई रिफायनरीचे कार्यकारी संचालक श्री. सुब्रमोनी अय्यर, मुख्य व्यवस्थापक (प्रचालने) श्री. एन. चंद्रशेखर, व्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. बिजू के. जॉर्ज, व्यवस्थापक (परिरक्षण) श्री. मोहन मते तसेच महानगरपालिकेचे उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी विभाग) श्री. रमाकांत बिरादार, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त श्री. विश्वास मोटे, यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता श्री. कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता श्री. रामेश्वर कांचनगिरे, सहायक अभियंता श्री. सुरेश येमेकर तसेच संबंधित इतर अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माहूल रस्त्यावर स्थित महानगरपालिका मैदानावर वैद्यकीय प्राणवायू जंबो सिलेंडर पुनर्भरण (Medical Grade Oxygen Cylinder Bottling Facility) प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी महानगरपालिकेने २ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, ४ स्कीड इत्यादी यंत्रणा खरेदी करुन प्रकल्प उभारणी सुरु केली आहे. त्यावर सुमारे ११ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी हातभार म्हणून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुंबई रिफायनरीने देखील संयंत्रे दान स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहेत. यामध्ये १ कॉम्प्रेसर, १ बफर व्हेसल, १ मॅनिफोल्ड स्कीड इत्यादी संयंत्रांचा समावेश आहे. त्यासोबत बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पापासून महानगरपालिकेच्या जंबो सिलेंडर पुनर्भरण प्रकल्पापर्यंत सुमारे दीड किलोमीटर लांबीची प्राणवायू वाहिनीदेखील बीपीसीएलने टाकली आहे. संयंत्रे व ही प्राणवायू वाहिनी मिळून सुमारे ४ कोटी रुपयांचा हातभार बीपीसीएलने लावला आहे.
 
बीपीसीएल मुंबई रिफायनरीच्या माहूलमधील वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्पामध्ये प्रतिदिन सुमारे ७२ मेट्रिक टन वैद्यकीय प्राणवायूची निर्मिती होते. पैकी प्रतिदिन सुमारे १० ते १५ मेट्रिक टन इतका वैद्यकीय प्राणवायू महानगरपालिकेच्या माहूलमधील वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर भरण्याच्या प्रकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. या सिलेंडर भरण्याच्या प्रकल्पामध्ये ७ घनमीटर क्षमतेचे सुमारे ६० सिलेंडर एका तासात भरता येतात. या हिशेबाने ८ तासांच्या एका सत्रामध्ये किमान ५०० जंबो सिलेंडर भरता येऊ शकतात. त्यासाठी ५ मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता असेल. म्हणजेच २४ तासांच्या तीन सत्रात १५ मेट्रिक टन प्राणवायू द्वारे एकूण १ हजार ५०० जंबो सिलेंडर भरले जावू शकतात.
 
बीपीसीएल मुंबई रिफायनरीने उपलब्ध करुन दिलेली संयंत्रे प्राप्त होताच त्यांच्या उभारणीची कार्यवाही देखील महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुरक्षाविषयक पूर्तता असल्याचे पेसो प्रमाणपत्र (PESO Certification) प्राप्त होताच सदर प्रकल्प कार्यरत होणार आहे.
 
कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या कालावधीत कोविड बाधितांना वैद्यकीय प्राणवायूची सातत्याने गरज असते. यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱया वैद्यकीय प्राणवायूची गरज पूर्ण व्हावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. माहूल येथील वैद्यकीय प्राणवायू जंबो सिलिंडर भरण्याचा प्रकल्प हा त्यादृष्टिने मोलाचा ठरणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.































(जसंवि/२९९)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या