कोरोनाचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या सायबर कॅफेवर कारवाई
मुंबई, दादासाहेब येंधे : कोविड-१९ चे आरटीपीसीआर प्रमाणपत्र देणाऱ्या सायबर कॅफे चालकाला गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना महामारीच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने विमान व रेल्वे प्रवासाकरिता कोविड-१९ आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यास अनुसरून गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे प्रभारी पोलिस निरीक्षक पंढरीनाथ पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अझारी नेट कॅफे, २३ निजाम रोड, पारसी गल्ली, समसुद्दिन बिल्डींग, शॉप नंबर-२, भेंडी बाजार याठिकाणी ग्राहकांना कोविड-१९ आरटीपीसीआर निगेटिव प्रमाणपत्र कोणतीही तपासणी न करता ७०० रुपयांत दिले जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या सायबर कॅफेमध्ये बोगस ग्राहक पाठवले. त्याला ७०० रुपयांत स्वॅब टेस्ट न करता लायफन्ट्री वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेडचे प्रमाणपत्र देताना पोलिसांनी कॅफे चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५,०३०/- रुपये रोख व सायबर कॅफेमधील इतर साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी कॅफेचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे.

0 टिप्पण्या