मुंबई, दादासाहेब येंधे : पतीसह सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा कौटुंबिक छळ करत माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रकार चेंबूरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून चेंबूर पोलीस अधिक तपास करत आहेत. चेंबूर मध्ये राहणाऱ्या मैत्री (वय ३६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंकित नावाच्या तरुणाशी त्यांचे लग्न ठरले. साखरपुड्याच्या वेळी मैत्रीच्या कुटुंबाने अंकितला अडीच तोळे वजनाची सोनसाखळी आणि ८५ हजार रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी भेट म्हणून दिली होती. जानेवारी २०१७ मध्ये तिचा अंकित सोबत विवाह पार पडला. लग्नावेळी आई-वडिलांनी मैत्रीला १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, कपडे आणि अन्य घरगुती वापराचे सामान दिले. तसेच अंकितला एक सोन्याचे कडे आणि एक सोन्याचे पेंडंट देखील दिले. गोव्यामध्ये हनिमूनला गेल्यानंतर अंकितला दारू पिण्याचे आणि गुटखा खाण्याचे व्यसन असल्याचे मैत्रीला समजले. यावरून घरांमध्ये रोज किरकोळ वाद सुरू झाले. पुढे तो व्यवसायात लक्ष देईनासा झाल्यानंतर संतती वरून देखील वाद वाढले.
नंतर २०१८ मध्ये पती आणि सासऱ्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी माहेरून तीन लाख रुपये घेऊन येण्यासाठी मैत्रीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. मुलीला होणारा मानसिक व शारीरिक छळ कमी करण्यासाठी आई-वडिलांनी ही रक्कम त्यांना पोहोच केली. एवढे करूनही मैत्रीचा छळ काही थांबला नाही. तिने घटस्फोट घेण्याबद्दल तिच्यासह तिच्या माहेरच्यांवर विविध प्रकारे दबाव टाकला जात होता. याला कंटाळलेल्या मैत्री हिने चेंबूर पोलीस ठाणे गाठून आपल्यावर होणाऱ्या छळाचा पाढा वाचला. त्यानंतर अंकितवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा