Ticker

6/recent/ticker-posts

कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास किंवा स्वतःमध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित कोविड-१९ चाचणी करून घ्यावी

 बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

        संपूर्ण मुंबई महानगरात मिळून २५० पेक्षा अधिक ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने विनामूल्य कोविड चाचणी सुविधा

कोविड-१९ विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा वेगाने फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोणत्याही कोविड बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास अथवा स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास तातडीने कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोविड-१९ विषाणू चाचण्यांच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्‍वभूमीवर तसेच निर्बंधांमध्ये देण्यात आलेली शिथिलता लक्षात घेता, कोविड विषाणू चाचणी संदर्भात पुनश्च एकदा प्रशासनाकडून यासंदर्भात सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोविड-१९ विषाणूचा डेल्टा प्रकार आत्तापर्यंत भारतासह जगातील एकूण अकरा देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. याचा परिणाम म्हणून संभाव्य तिसरी लाट येऊ शकतेअशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. कोविड लसीकरणामुळे संसर्गाच्या प्रसारास काहीसा आळा बसला असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोविड-१९ संसर्गाची बाधा झाल्याचे निदान लवकरात लवकर झाले तर हा आजार पसरण्यापासून रोखणे शक्य तर होतेच, त्यासोबत संबंधित रुग्ण लवकर बरा होण्यासह त्याचा रूग्णालयात दाखल होवून तिथे राहण्याचा कालावधी देखील कमी होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे २५० ठिकाणी विनामूल्य आरटीपीसीआर आणि ऍण्टीजेन चाचणी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह, विभाग कार्यालये तसेच कोविड केंद्र या सर्वांचा समावेश आहे.

सदर चाचणी केंद्रांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच विभाग नियंत्रण कक्षांमध्ये देखील तपशिल उपलब्ध आहे. त्याआधारे आपल्या घरानजीकचे विनामूल्य कोविड चाचणी केंद्र आणि त्यांची वेळ इत्यादी माहिती नागरिक प्राप्त करू शकतात.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोविड-१९ विषाणू सुसंगत वर्तन राखावे. मास्कचा उपयोग करावा. हातांची नियमित स्वच्छता राखावी. सुरक्षित अंतर राखावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोणत्याही कोविड-१९ बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास अथवा कोणत्याही प्रकारचे लक्षण स्वतःमध्ये आढळून आल्यास त्वरेने कोविड-१९ चाचणी करून घ्यावी.

 ज्या ज्येष्ठ नागरिकांना सहव्याधी आहेत (उदाहरणार्थ फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार, मधुमेह, मेंदूविकार, रक्तदाब) अशा नागरिकांस प्रसूतीकाळ नजीक असलेल्या गर्भवती माता, डायलिसिस रुग्ण, कर्करूग्ण इत्यादी जोखीम गटातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असेदेखील आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनेकरण्यात येत आहे.



















(जसंवि/३०४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या