बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात प्रतिवर्षी फेब्रुवारी महिन्यात फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येते. त्यामध्ये देशभरातून प्रतिनिधी सहभागी होतात. तथापि, कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीमध्ये येणाऱया अडचणी तसेच कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, फेब्रुवारी - २०२२ मधील फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात फुले, फळे व भाज्या, झाडे किंवा रोपे यांचे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. सदर प्रदर्शन जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरवण्यात येते. प्रदर्शनाचा कालावधी तीन दिवसांचा असतो. या तीन दिवसात अंदाजे दोन ते तीन लाख नागरिक व शाळकरी मुले या प्रदर्शनाला भेट देतात. त्यासोबत प्रदर्शन पाहण्यासाठी विविध मान्यवर तसेच नामांकित मंडळीदेखील आवर्जून भेट देतात.
या प्रदर्शनात सामाजिक संदेश देणारी व नवनवीन संकल्पनांवर आधारित पुष्प रचना व प्रतिकृती तयार करण्यात येते, तसेच विविध फुल झाडे, दुर्मिळ वनस्पती व झाडे, औषधी वनस्पती इत्यादी प्रदर्शित करून त्यांची माहिती दिली जाते. भारतातील विविध ठिकाणावरून रोपवाटिका मालक रोपे विक्रीसाठी या प्रदर्शनात येतात व नामांकीत कंपन्या देखील लँडस्केप डिझाईनद्वारे त्यांच्या नवनवीन संकल्पना मांडतात.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागातील उद्यान खात्यातील कर्मचाऱयांमार्फत सप्टेंबर महिन्यापासून या प्रदर्शनासाठी पूर्वतयारी सुरू होते. विविध प्रकारच्या शोभेच्या फुलांचे व भाज्यांच्या बिया जमवणे, बियांपासून रोपं तयार करणे, कुंड्या तयार करणे, फळे व फळ झाडांची निगा राखणे, तसेच प्रतिकृती तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, सांगाडे तयार करणे या सर्व बाबींचा यामध्ये समावेश असतो. महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व २४ प्रशासकीय विभागातील उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माळी आणि कामगार एकत्र येऊन त्यासाठी कामकाज करतात. प्रदर्शनाची कार्यक्रमपुस्तिका आणि निमंत्रणपत्रके छापून वितरित करणे, प्रदर्शनाचे फलक तयार करणे, प्रचार व प्रसार साहित्य तयार करुन मुंबईतील सर्व २४ विभागात पोहचविणे, मान्यवर मंडळींना आमंत्रित करणे इत्यादी कामकाजासाठी प्रत्येक विभागातील सहाय्यक उद्यान अधीक्षक व उद्यान विद्या सहाय्यक सातत्याने कार्यरत असतात.
सद्यस्थितीत सर्वत्र कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव कायम असून मुंबईसह देशभराने संसर्गाच्या दोन लाटा अनुभवल्या आहेत. तसेच तिसरी लाट येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. अशा स्थितीत उद्यान विभागातील अधिकारी, सर्व कर्मचारी यांच्यासह खासगी क्षेत्रातील सह-आयोजक, प्रदर्शनात उपस्थित राहणारे प्रतिनिधी या सर्वांनी पूर्वतयारीसह प्रत्यक्ष प्रदर्शनात सातत्याने एकत्र येणे हे कोविड – १९ संसर्गाच्या दृष्टीने धोक्याचे ठरु शकते. तसेच, प्रत्यक्ष प्रदर्शनाच्यावेळी लाखोंच्या संख्येने नागरिकांनी येणे धोक्याचे ठरु शकते. प्रदर्शन कालावधीपर्यंत कोविड संसर्ग संपुष्टात आला नाही आणि त्यामुळे ऐनवेळी प्रदर्शन रद्द करावे लागले तर पूर्वतयारीचे संपूर्ण श्रम आणि खर्च वाया जातील. देशभरातून सहभागी होणाऱया रोपवाटीका मालक व प्रदर्शनाशी संबंधीत कंपन्या यांनादेखील अडचणी निर्माण होऊ शकतात. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील उपलब्ध जागेमध्ये लाखोंच्या संख्येने प्रदर्शनात येणाऱया नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देशदेखील पाळणे शक्य होणार नाही. परिणामी, संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतो.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, फेब्रुवारी २०२२ मध्ये नियोजित फुले, फळे व भाज्यांचे प्रदर्शन रद्द करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
(जसंवि/२९३)
0 टिप्पण्या