घाटकोपर मधील घटना, दिराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई, दादासाहेब येंधे : चुलत भाऊ कामानिमित्त दुबईत असल्याने घरात असलेल्या वहिनीला दिरानेच लग्नासाठी गळ घातली. वहिनीने नकार देताच रागात कुटुंबीयांवर चाकूने हल्ला चढवला. त्याची बहिण भाऊ आणि आई देखील जखमी झाली आहे. घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीच्या ३० वर्षीय बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार चुलत भाऊ कामानिमित्त दुबईत असतो. त्याची पत्नी सोबत राहत आहे. भावाने वहिनीकडे लग्नासाठी तगादा लावला होता. वहिनीने नकार दिला यामुळे रागात त्याने कुटुंबीयांना शिवीगाळ सुरू केली.
शनिवारी घरी आल्यानंतर भावाने पुन्हा शिवीगाळ सुरू केली आणि जवळील चाकूने हल्ला चढवला. त्याने आईलाही मारले. जीव वाचवण्यासाठी बहिणीने त्याच्या डोक्यात पाण्याचा मटका मारला. नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहून त्याने तेथून पळ काढला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तात्काळ घाटकोपर पोलीस तेथे दाखल झाले व त्यांनी जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

0 टिप्पण्या