सव्वा दोन कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत चार वेगवेगळ्या कारवायांत अमली पदार्थविरोधी पथकाने सव्वादोन कोटी रुपयांचा एमडी गांजा आणि कोकेन या ड्रग्सचा साठा तसेच रोख रक्कम जप्त केली आहे. याच गुन्ह्यात पोलिसांनी ७ जणांना अटक केली असून त्यात दोन नायजेरियन नागरिकांसह एका महिलेचाही समावेश आहे. अटकेनंतर सर्वांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
अटक केलेल्यांमध्ये इफॅनी पायुस, अन्वर सय्यद, मुदस्सर शेख, शहानुर पटेल उर्फ शानू पटेल, उचे चुक्यु, खुशाल डोंगरे आणि बिल्किस शेख यांचा समावेश आहे. अंधेरी, मशिद बंदर, डोंगरी आणि रे रोड परिसरात काही जण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर, वांद्रे-वरळी आणि आझाद मैदान युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने चार पथकांची नियुक्ती करून तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
वांद्रे युनिटने अन्वर सय्यद याला अंधेरी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे एक कोटी दोन लाख रुपयांचे पाच ते दहा ग्रॅम वजनाचे ड्रग्स जप्त केले तर दुसऱ्या पथकाने डोंगरीतील वाडीबंदर, रायचूर स्ट्रीट परिसरात कोकेन विक्रीसाठी आलेल्या इफॅनी पायुस या नायजेरियन नागरिकांना अटक केली. त्याच्याकडून अधिकाऱ्यांनी ३९ लाख ६० हजार रुपयांचे १३२ ग्रॅम कोकेन जप्त केले.
डोंगरी येथून घाटकोपर युनिटच्या अधिकाऱ्यांनी नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक केली. मुदस्सर, शहानुर आणि उचे अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ८२ लाख रुपयांचे ५४५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स जप्त केले. तर चौथ्या कारवाईत वरळी युनिटच्या अधिकाऱ्यांनी महिलेसह दोघांना अटक केली. तर एकूण ४ कारवायांत दोन कोटी २५ लाख ७५ हजार रुपयांचे ड्रग्ज आणि दोन लाख ३७ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
प्रेस नोट

0 टिप्पण्या