Ticker

6/recent/ticker-posts

झाडांची छाटणी करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगी प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आणि "MCGM 24 x 7" या भ्रमणध्वनी ॲप वर उपलब्ध

 ऑनलाइन परवानगी घेऊन झाडांची सुयोग्य व शास्त्रशुद्ध छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याचे आवाहन
 झाडे छाटणीची परवानगी देण्यात येते नि:शुल्क; जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी झाडांची शास्त्रीय व सुयोग्य निगा गरजेची
 बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणा-या झाडांची / वृक्षांची निगा महापालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असते. तथापि, सोसायटी, शासकीय - निमशासकीय संस्था, खाजगी जागा इत्यादींमध्ये असणा-या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. यानुषंगाने आवश्यक ती परवानगी प्रक्रिया नि:शुल्क असून परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे.  याचबरोबर  नागरिकांना घर बसल्या वृक्ष छाटणी परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या "portal.mcgm.gov.in" या संकेतस्थळावर आणि "MCGM 24x7" या भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइडवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात उद्यान खात्याची विशेष बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती भिडे यांनी उद्यान विभागाला पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करण्याचे आवाहन महापालिकेचे उद्यान अधिक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

'महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५' नुसार महापालिका क्षेत्रातील झाडांची छाटणी किंवा मृत / धोकादायक झाड कापावयाचे झाल्यास त्याबाबत महापालिकेद्वारे पूर्व परवानगी प्राप्त करुन सुयोग्य छाटणी करणे बंधनकारक आहे. तसेच छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कच-याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधितांचीच आहे. 

महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे झाडाची छाटणी करावयाची झाल्यास महापालिकेच्या नियमांनुसार विहित शुल्क पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे (Ward Office) जमा केल्यानंतर सामान्यपणे त्यापुढील ७ दिवसांत झाडांच्या छाटणीची प्रक्रिया केली जाते. महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे छाटणी केल्यास कच-याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची कार्यवाही ठेकेदाराद्वारेच केली जाते. झाडे छाटणी साठी ठेकेदाराद्वारे आकारले जाणारे शुल्क हे झाडाचा प्रकार - आकार व‌ संबंधित परिस्थिती यावर आधारित असते.
वरील व्यतिरिक्त मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा सकृतदर्शनी धोकादायक झालेल्या झाडांबाबत महापालिकेच्या नागरी सेवा सुविधा विषयक १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशीही  देखील (Junior Tree Officer) संपर्क साधाता येईल व त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घेता‌ येईल.

महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी जागा असो किंवा शासकीयनिमशासकीय जागा;  या झाडांची छाटणी ही महापालिकेच्या पूर्व परवानगीनुसार पावसाळ्यापूर्वीच करावी, जेणेकरुन संभाव्य जीवित अथवा वित्तहानी टाळता येईल; असे आवाहन उद्यान अधीक्षक श्री. परदेशी यांनी याबाबतनिमित्ताने पुन्हा एकदा केले आहे.

१. वर्ष २०१८ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत, अशी माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.
 २. "MCGM 24 x 7" हे भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइड ॲप गुगल प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर व ओटीपी पडताळणी (OTP Verification) केल्यानंतर ॲप मधील 'गो टू सर्विस' (Go to service) या लिंक वर क्लिक केल्यावर उघडणाऱ्या 'ट्री ट्रिमिंग' (Tree Trimming) या लिंक अंतर्गत झाडे छाटणी ची ऑनलाइन परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू होते.

 ३. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "portal.mcgm.gov.in" या संकेतस्थळाद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने झाडे छाटणीची परवानगी मिळू शकते. यासाठी महापालिकेच्या सदर संकेतस्थळावर गेल्यानंतर 'नागरिकांकरिता' (For Citizen) या अंतर्गत 'अर्ज करा' (Apply) या पर्यायामध्ये 'उद्यान व वृक्ष' (Garden & Tree) या पर्याय अंतर्गत झाडे छाटणीच्या परवानगीची ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 ४. झाडे छाटणी ची परवानगी ही नि:शुल्क आहे. परवानगी मिळाल्यानंतर प्राप्त झालेल्या परवानगीनुसार संबंधित कंत्राटदाराद्वारे झाडे छाटणी करून घेण्यासाठी कंत्राटदाराद्वारे यथोचित शुल्क आकारणी केली जाते. ही शुल्क आकारणी झाडाचा प्रकार, झाडाची उंची, झाडाचा घेर आणि संबंधित परिस्थितीजन्य बाबींची तपासणी करून त्यानुसार केली जाते.





























 
( जसंवि/१२२)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या