मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले लोकार्पण
मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोरी पेडणेकर, आमदार विलास पोतनीस व आमदार मनीषा चौधरी यांची विशेष उपस्थिती
मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील अव्याहतपणे घेत असते. याच दृष्टीने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून ही संख्या वाढविण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून बोरीवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या परिसरात एक लसीकरण केंद्र आजपासून कार्यान्वित करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या लसीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबईच्या प्रथम नागरिक व महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित लसीकरण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमाला आमदार श्री. विलास पोतनीस, आमदार श्रीमती मनीषा चौधरी, मान्यवर नगरसेवक व नगरसेविका हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर उपायुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त श्रीमती भाग्यश्री कापसे, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका यांच्यासह परिसरातील मान्यवर नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
(जसंवि/१२३)


0 टिप्पण्या