मुंबई, दादासाहेब येंधे : इमारतीच्या गच्चीवर चढून एक तरुणी आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचा कॉल येताच ताडदेव पोलीस ठाणेचे पोलीस तात्काळ तेथे हजर झाले. त्यांनी त्या तरुणीला बोलण्यात गुंतवले अन इतर पोलीस सहकाऱ्यांनी तिला पाठीमागून जाऊन पकडले. पोलिसांच्या या प्रसंगावधनामुळे १९ वर्षीय तरुणीचे प्राण वाचले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आठच्या सुमारास एक तरुणी म्हाडाच्या चार मजली इमारतीवर चढून आत्महत्या करण्याची भाषा करीत होती. या घटनेमुळे तेथील परिसरात खळबळ माजली होती. पोलीस ठाण्याजवळच असलेल्या या इमारतीकडे तात्काळ धाव घेत त्या तरुणीचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांची दुसरी टीम शेजारीच असलेल्या दुसऱ्या इमारतीवरून गच्चीच्या दिशेने गेले आणि संधी मिळताच त्या तरुणीला ताब्यात घेत तिचे प्राण वाचवले.
पोलिसांनी तिला पोलीस ठाणेत आणून तिची चौकशी केली असता तिचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले असून, घरगुती समस्यांना कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा पोलिसांना सांगितला. ताडदेव पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या घटनेला दुजोरा देत या तरुणीने पुन्हा असे टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून तिचे समुपदेशन केल्याचे सांगितले.

0 टिप्पण्या