Ticker

6/recent/ticker-posts

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होताच कामा नये - भाई जगताप.....

लॉकडाऊनला काँग्रेसचा विरोध 

मुंबई : लॉकडाऊनच्या बाबतीत वेगवेगळे सूर व प्रवाह ऐकायला मिळत आहेत. पण काँग्रेसचे स्पष्ट मत आहे की, लॉकडाऊन हा होताच कामा नये. कारण मागच्या वर्षी लॉकडाऊन झाला, त्यानंतर वर्षभर सर्वसामान्य नागरिकांची इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती, हे आपण सर्वानी पाहिलेले आहे. कामगार, व्यापारी, छोटे व मोठे उद्योजक, सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच या वाईट परिस्थितीतुन त्यावेळेस जावे लागले होते. या लॉकडाऊनमध्ये जनतेने आयुष्यभर जे जमवलं होतं, ते वापरून कसा बसा आपला संसार चालवला होता. पण आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले, तर मात्र त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर व त्यांच्या कुटुंबियांवर होतील. म्हणून लॉकडाऊन हा होताच कामा नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि यापुढे ही हीच भूमिका राहील. लॉकडाऊन करण्याऐवजी कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन अधिक कडक प्रतिबंधात्मक उपाय व नियम लागू करावेत, अशी आमची शासनाजवळ मागणी आहे आणि राज्य सरकारला सुद्धा ही भूमिका पटलेली आहे, असे दिसून येत आहे, असे माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत पत्रकार पत्रकार परिषदेत  दिली. या पत्रकार परिषदेला भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, खजिनदार भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर सुद्धा उपस्थित होते. 

भाई जगताप पुढं म्हणाले की, आता शासनाने रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे किंवा या संचारबंदीच्या वेळेत वाढ करण्याची किंवा त्याबाबतीत जास्त कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शालान्त परीक्षांवर परिणाम होणार आहे. अनेक शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा पालकवर्ग यांनी मला भेटून आपल्या समस्या सांगितल्या आहेत. सर्वांची एकच मागणी आहे की इयत्ता १ ली ते ९ वी आणि ११ वी च्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्याबाबत शासनाने अनुमती द्यावी व   त्यांच्या म्हणण्यानुसार मी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांना विनंती केली आहे की, इयत्ता १ ली ते ९ वी आणि ११ वी च्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्याबाबत शासनाने अनुमती द्यावी  व त्यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात यावेत.

भाई जगताप पुढे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मी अशी माहिती दिली होती की, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि. २ एप्रिल रोजी पक्षाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच शनिवार दि. ३ एप्रिल रोजी मुंबई काँग्रेसच्या छाननी व रणनीती समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. परंतु राज्यातील कोविडची परिस्थिती अत्यंत बिघडत चालली आहे. त्यामुळे शासनाकडून काही नवीन गाईडलाईन्स देण्यात आल्या. त्यानुसार २० लोकांपेक्षा जास्त लोकांच्या सभा घेण्यात येऊ नयेत असा नियम सूचना शासनातर्फे करण्यात आलेल्या आहेत आणि शासनाच्या सूचनेचा आदर ठेवत आम्ही या दोन्ही बैठका पुढे ढकलल्या आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे भाई जगताप म्हणाले. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या