श्वास कोंडला, प्राण हरपला!
कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे असंख्य रुग्ण ऑक्सिजनसाठी तडफडत असताना नाशिक मध्ये बुधवारी घडलेल्या भयंकर दुर्घटने महाराष्ट्राचा श्वास रोखला. ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने रुग्णांना सुरू असलेला प्राणवायू अचानक थांबला आणि २४ रुग्णांनी तडफडून प्राण सोडले. तंदुरुस्त माणूस जिथे दहा मिनिटे सुद्धा श्वास रोखून धरू शकत नाही तिथे ही गळती झाल्यानंतर तब्बल दीड तास ऑक्सिजन पुरवठा बंद पडला आणि नाशिक महापालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयाचे दार ठोठावून काळ पुरुष आत मध्ये आला. काही क्षणापूर्वीपर्यंत सुरू असलेला ऑक्सिजन मिळणे अचानक बंद झाले. बाहेर ऑक्सिजनच्या गळतीने धुराचे लोळ उठले होते. काय झाले याचा अंदाज येताच कोरोनाची तमा न बाळगता नातेवाईक आत धावत गेले. आपल्या रुग्णाला छाती दाबुन, पंपिंग करून वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. ऑक्सीजन सिलेंडर लावून पाहिले मात्र, सारे काही क्षणात संपले होते. ऑक्सिजन गळतीच्या अवघ्या २० मिनिटात २४ रुग्ण मृत्युमुखी पडले. हुसेन रुग्णालयात सुरू असलेला आक्रोश ऐकून उभा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
काय घडले ..?
* दुपारी बारा वाजता ऑक्सिजन घेऊन टँकर आला. रुग्णालयाच्या ऑक्सिजनच्या टाकीत या टँकरमधून द्रवरूप ऑक्सिजन टाकला जाणार होता. ऑक्सिजन टाकण्यास सुरुवात होताच रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीतून गळती झाली.
* या टाकीला बारीक छिद्र पडले होते बघता बघता हे छिद्र मोठे झाले आणि टाकीतील ऑक्सिजन रुग्णालयाच्या आवारात पसरून धुराचे लोट उठले आणि समोरचे दिसेनासे झाले.
* गळती थांबवण्यासाठी टॅंकर वरील कर्मचारी, तंत्रज्ञ अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. रुग्णांच्या नातेवाइकांना आधी ही रुग्णालयाच्या आवारातील दुर्घटना वाटली. मात्र, थेट आपल्या नातेवाईकांचा ऑक्सिजन पुरवठा थांबल्याचे कळताच त्यांनी कोरोना वॉर्डात धाव घेतली.
व्हायरल व्हिडिओ

0 टिप्पण्या