Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात रात्रीची संचारबंदी

रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत कर्फ्यु 

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना साथीचा राज्य आणि देशभरातील फैलाव आटोक्यात येत असतानाच ब्रिटनमध्ये विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने जगभरात पुन्हा चिंतेचे सावट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीही देशभरात खबरदारी आणि सज्जता असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तर राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात आज मंगळवारपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ५ जानेवारी २०२१ पर्यंत हे निर्बंध असतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी जाहीर केले. कोरोनाविषाणूचे बदलते स्वरूप समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाय योजनांसाठी बैठक घेतली. त्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला. संपूर्ण युरोप आणि मध्यपूर्व देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांचे विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण तर अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे घरगुती विलगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिक खबरदारी घेण्यात येत असून पुढील पंधरा दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या